कल्याण: कल्याण लोकसभेतील उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचार दौऱ्यात कल्याण, डोंबिवली परिसरातील ज्येष्ठ जाणते शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. वैशाली दरेकर या पूर्वाश्रमीच्या कट्टर शिवसैनिक. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर शिवसेनेतील एक गट राज ठाकरे यांच्या सोबत गेला. त्यामध्ये दरेकर यांचा समावेश होता. स्वच्छ, आक्रमक चेहरा, प्रभावी वक्तृत्व आणि लढाऊ बाण्यामुळे दरेकर यांची पक्षप्रमुखांनी उमेदवारीसाठी निवड केली. आम्ही पक्षातील ज्येष्ठ, उमेदवारीचे दावेदार असुनही पक्षप्रमुखांंनी आमचा विचार न केल्याने ठाकरे गटातील काही पुरूष महिला पदाधिकारी नाराज आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या नाराजीमुळे डोंबिवली, कल्याणमधील शिवसेनेचा ज्येष्ठ जाणत्या शिवसैनिकांचा महिला, पुरूषांचा गट दरेकर यांच्या प्रचार दौऱ्यापासून दूर असल्याचे दिसते. दरेकर यांचे समर्थक मोजके युवा कार्यकर्ते त्यांची प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. वैशाली दरेकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांनी ज्येष्ठ शिवसैना पदाधिकारी, माजी नगरेसवक, महिला आघाडी, ग्रामीण भागातील पदाधिकाऱी, कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक घेतली नसल्याचे ज्येष्ठ शिवसैनिक सांगतात.

हेही वाचा : ठाण्यासाठी संजीव नाईक अजूनही आशावादी

दरेकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांना निवडून आणण्यासाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी एकदाही स्थानिक पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी, निवडून आणण्याची व्यूहरचना याविषयी बोलविले नसल्याने स्थानिक कार्यकर्त्यांंमध्ये नाराजी आहे. उमेदवारी जाहीर होताच दरेकर यांनी आपणास विश्वासात न घेता आपल्या मोजक्या कार्यकर्त्यांना घेऊन प्रचार सुरू केल्याने त्या नाराजीतून त्यांच्या प्रचार कार्यात स्थानिक महिला, पुरूष पदाधिकारी नसल्याचे समजते. आपली उमेदवारी पक्षप्रमुखांनी जाहीर केल्याने दरेकर यांनी दणक्यात प्रचार सुरू केला आहे.

कुठे लग्न कार्यात, जाहीर समारंभात भेटल्या तरच आमची भेट होते. त्यावेळी आम्हाला दरेकर या आमच्या उमेदवार आहेत असे जाहीरपणे सांगावे लागते, असे ज्येष्ठ शिवसैनिक सांगतात. दरेकर यांनी प्रचाराचा सर्वाधिक भर कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, कळवा मुंब्रा या भागात दिला आहे. या भागातील प्रतिस्पर्धींची नाराज मते आपणास मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत.

हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी कल्याणमध्ये; कल्याण – भिवंडीमधील उमेदवारांसाठी प्रचार सभा

वैशाली दरेकर या पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांंनी जाहीर केलेल्या उमेदवार आहेत. त्यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिकांचा पाठिंंबा आहे. सर्व त्यांच्या प्रचारात आहेत. शिवसेनेची मोडतोड केलेल्यांच्या मुलाला एक महिला तगडी लढत देत आहे. नकली उमेदवार दिला म्हणून काही जण मुद्दाम अफवा उठवत आहेत. त्यांना निवडणुकीनंतर योग्य उत्तर मिळेल.

गुरूनाथ खोत (संपर्कप्रमुख, कल्याण लोकसभा)

सर्व शिवसैनिकांंना विश्वासात घेऊन आपले प्रचार कार्य सुरू केले आहे. प्रचारात सर्व शिवसैनिक सहभागी असतात. उमेदवाराच्या मागे फिरले म्हणजे प्रचार नाही तर काही जण आपल्या प्रभागांमध्ये प्रचारात आहेत.

वैशाली दरेकर (उमेदवार)

हेही वाचा : कल्याण: टिटवाळा जवळील म्हस्कळ गावातील श्री शंकर महाराज मंदिरात चोरी

आम्ही सर्व शिवसैनिक दरेकर यांच्या प्रचारात आहोत. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचाराला आणखी जोर येईल.

सदानंद थरवळ (जिल्हाप्रमुख)
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan senior shivsainik absent for campaign of uddhav thackeray s shivsena candidate vaishali darekar css