कल्याण – कल्याण शिळफाटा रस्त्यावर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या टँकरद्वारे मेट्रोच्या कामासाठी शिळफाटा रस्त्याच्या मध्यभागी लावण्यात आलेल्या निळ्या संरक्षित पत्र्यांंवर पाणी मारण्याचे काम केले जाते. पाणी मारण्यासाठी हे टँकर रस्ता अडवून उभे राहत असल्याने मध्यरात्रीच्या सुमारास या पाण्याच्या टँकरमुळे कोंडी होत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत.

दुसरी, रात्र पाळी संपवून अनेक कर्मचारी आपल्या दुचाकी, चारचाकी वाहनाने मध्यरात्रीच्या सुमारास शिळफाटा रस्त्याने घरी परतत असतात. रात्री दहा, अकरा वाजल्यानंतर शिळफाटा रस्त्यावरील हलक्या वाहनांचे प्रमाण कमी होते. या रस्त्यावर अवजड मालवाहू वाहनांचे प्रमाण अधिक असते. रात्रीच्या वेळेत कोंडी होत नसल्याने वाहतूक पोलीस रात्री दहा वाजल्यानंतर गस्तीवरून निघून जातात. मेट्रोच्या कामासाठी मेट्रो कंपनीकडून ३१ वाहतूक सेवक कोळसेवाडी वाहतूक विभागाला वाहतूक नियोजनासाठी उपलब्ध करून दिले आहेत. हे वाहतूक सेवक दिवसभर, रात्रीच्या वेळेत वाहतूक कोंडी असेल त्यावेळी कोळसेवाडी वाहतूक पोलिसांच्या समवेत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपस्थित असतात.

मागील काही दिवसांपासून मध्यरात्री दीड वाजताच्या दरम्यान मेट्रोच्या कामासाठी शिळफाटा रस्त्याच्या मध्यभागी लावण्यात आलेल्या यंत्रणेला संरक्षित करण्यासाठी निळ्या रंगाचे १० फुटाचे उभे पत्रे लावण्यात आले आहेत. मेट्रोच्या कामाचा वाहनांना कोणताही अडथळा येऊ नये हा त्यामागील उद्देश आहे. या मेट्रोच्या संरक्षित पत्र्यांमुळे अनेक ठिकाणी रस्ते मार्गिका अरूंद झाल्या आहेत.

हे संरक्षित पत्रे धुण्यासाठी मध्यरात्रीच्या वेळेत पाण्याचे टँकर आणले जातात. हे टँकर अरूंद मार्गिका अडवून मेट्रो कामाला संरक्षित करणारे पत्रे धुण्याचे काम वाहिकेतून करतात. एकाच जागीच बराच वेळ टँकर उभा राहत असल्याने वाहन चालकांना त्या टँकरमागे थांबून राहावे लागते. पाण्याचा टँकर अरूंद मार्गिकेतून पुढे जात नाही. तोपर्यंत रस्ता मोकळा होत नाही, अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत.
पाणी वाया

संरक्षित पत्रे मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर असल्याने त्यांंच्यावर दररोज धूळ, कचरा उडणार आहे. ते पत्रे लख्ख निळे ठेवण्यासाठी हजारो लीटर पाणी वाया का घालविले जाते. या पाण्यामुळे रात्रीच्या वेळेत शिळफाटा रस्त्यावर पाण्याचे लोट वाहतात. माती आणि पाण्याच्या मिश्रणामुळे पाणी मारलेल्या ठिकाणी दुचाकी स्वार घसरून पडतात, अशा तक्रारी आहेत. पत्रे धुण्यासाठी हजारो लीटर पाणी फुकट घालून एमएमआरडीए, मेट्रो कंपनी काय साध्य करत आहे, असे प्रश्न प्रवासी करत आहेत.

शिळफाटा रस्त्यावरील मेट्रो कामाच्या संरक्षित पत्र्यांवर प्रवासी थुंकून घाण करतात. पत्र्यांवर धूळ साचते. या पत्र्यांची सीमारेषा वाहन चालकांना कळावी म्हणून हे पत्रे स्वच्छ ठेवण्यासाठी पाणी मारले जाते.

प्रफुल्ल जामदार, कार्यकारी अभियंता, एमएमआरडीए.