कल्याण : कल्याण पश्चिमेतील अहिल्याबाई चौकात सोमवारी शिंदे शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या राणी दिलीप कपोते यांनी भर रस्त्यात शिंदे शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांना चोप दिला. या संदर्भातच्या दृश्यध्वनी चित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित झाल्या आहेत.
माजी नगरसेवक मोहन उगले यांना महिलेने बेदम मारहाण केल्याने त्याचीच जोरदार चर्चा कल्याण, डोंबिवली शहर परिसरात सुरू आहे. विकास कामाच्या भूमिपूजनातील श्रेयवादावरून हा वाद झाल्याची चर्चा आहे. मिळालेली माहिती अशी की, डाॅ. तेलवणे रुग्णालया समोरील परिसरात रविवारी रस्ते कामाचा भूमिपूजन समारंभ झाला. यावेळी माजी नगरसेवक मोहन उगले आणि इतर शिवसैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या ठिकाणी भूमिपूजन समारंभावरून धुसफूस झाली होती.
मोहने उगले यांनी माध्यमांना सांगितले, रविवारी आपल्या भागात एक भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता. तेथे काही प्रकार घडला होता. त्यानंतर आपण पालिकेत आलो. कायद्याने महिलांना संरक्षण आहे. आतापर्यंत त्या महिलेला आपण काहीही बोललेलो नाही आणि बोलणारसुध्दा नाही. शिवसेनेशी त्यांचा संबंध नाही. मात्र, पक्षाने अशा कार्यकर्त्यांवर कारवाई केली पाहिजे. घडल्या प्रकाराची आपण बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
राणी कपोते यांनी माध्यमांना सांगितले, अहिल्याबाई चौकात असताना माजी नगरसेवक मोहन उगले यांनी आपणास शिवीगाळ आणि काही अपशब्द वापरले. त्यामुळे त्याचा जाब विचारत असताना त्यांनी आपल्याशी गैरवर्तन केले. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी मी आक्रमक भूमिका त्यांनी केलेल्या कृतीचा प्रतिकार केला. एक सक्षम महिला म्हणून स्वरसंरक्षणासाठी मला जी त्यांना धडा शिकवण्यासाठी आक्रमक कृती करायची होती ती मी केली आहे.
घडल्या प्रकाराची छायाचित्रे राणी कपोते यांनी स्वताच्या समाज माध्यमावर प्रसारित करून ‘नारी न्याय गॅरेंटी सुरुवात स्वतापासूनच’ असे वाक्य लिहिले आहे.