कल्याण: काही लोकांना वाटते की आम्हाला लोकांची खूप सहानुभूती आहे. सहानुभूती असती तर यांचे उमेदवार लाखोंच्या मतांनी निवडून आले असते. पण तसे काहीच झाले नाही. महायुती आणि महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फक्त ०.३ टक्के मतांचा फरक आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत लोक तुमच्या डोळ्यात अंजन घालतील, अशा शब्दात कल्याण लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांंनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना टोला लगावला.
सलग तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल कल्याण जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, आमदार विश्वनाथ भोईर, भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, माजी आमदार नरेंद्र पवार उपस्थित होते. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे शिवसैनिक मुख्यमंत्रीे एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठाम आहेत. उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील शिवसैनिक विकासाच्या मुद्द्यावर आमच्याच पाठीशी आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत याच शिवसैनिकांच्या बळावर येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात वेगळे चित्र दिसेल, असा विश्वास खासदार शिंदे यांंनी व्यक्त केला.
हेही वाचा : मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनरच्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू
लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी चुकीचे कथानक रचले. जाती, धर्माच्या आधारावर मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित केले. पण हे चित्र तात्पुरते आहे. लोकांची दिशाभूल एकदाच करता येते. ती सतत करता येत नाही, असे खासदार शिंंदे यांंनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीप्रमाणे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन खासदार शिंदे यांनी केले. केंद्रातील मंत्रीपद आपण स्वत: हून नाकारले, असे खासदार शिंंदे यांनी स्पष्ट केले.