कल्याण : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे, भिवंडी, उल्हासनगर विभागाच्या पथकाने गुरुवारी सकाळी कल्याण मधील वर्दळीच्या रस्त्यावरील सुभाष चौक भागात ४३ लाखांचा बनावट देशी मद्याचा साठा एका बंदिस्त टेम्पोमधून जप्त केला. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या मद्याच्या बाटल्यांवर प्रवरा डिस्टलरी, प्रवरानगर निर्मित राॅकेट संत्रा देशी दारू असा छाप उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना आढळून आला आहे. साईनाथ नागेश रामगिरवार (२७), अमरदीप शांताराम फुलझेले अशी अटक आरोपींची नावे आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ सुनील चव्हाण, प्रसाद सुर्वे, अशोक शिनगारे, डाॅ. नीलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर, ठाणे, भिवंडी येथील उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. बनावट मद्याचा साठा घेऊन एक ट्रक कल्याण शहरातून जाणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना मिळाली होती. गुरूवारी सकाळपासून अधिकारी कल्याणमधील बाईच्या पुतळ्या जवळ सुभाष चौकात सापळा लावून बसले होते.
हेही वाचा : ठाण्यात आता ज्येष्ठांना मोफत बस प्रवास, महिलांना ५० टक्के सवलत
ठरल्या वेळेत एक ट्रक सुभाष चौकातून जात होता. पथकाने चालकाला थांबण्याचा इशारा केला, पण ट्रक चालक वेगाने पुढे जाऊ लागला. पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याला पाठलाग करून अडविले. त्या ट्रकची झडती अधिकाऱ्यांनी घेतली. त्यात बनावट देशी दारूच्या ४८ हजार ४०० बाटल्या ४८४ खोक्यांमध्ये भरलेल्या आढळल्या. ही दारू कोठून आणली, कोठे नेत होता याबाबत विचारले असता चालकाने माहिती दिली नाही. पोलिसांनी अवैध दारू वाहतूक आणि दारूबंदी कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. ट्रकसह मद्याचा ४३ लाखांचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे.