कल्याण: माटुंगा ते कसारापर्यंत प्रवास करणाऱ्या महिलेच्या बटव्यातील मोबाईल, सोनसाखळी असा एकूण दीड लाखाहून अधिक किमतीचा ऐवज गुरूवारी चोरीला गेला. रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी चोराला पकडून महिलेचा चोरीला गेलेला ऐवज परत केला. ठाण्यात संभाजीनगर भागात राहणाऱ्या श्वेता हेमंत शिंदे (२३) या नोकरदार आहेत. त्या माटुंगा भागात नोकरीला जातात. गुरूवारी कामावरून सुटल्यावर त्या माटुंगा रेल्वे स्थानकात कसाराकडे जाणाऱ्या लोकलमध्ये बसल्या. त्यांना ठाणे येथे उतरायचे होते. पण बाहेर उन्हाची काहिलीने त्या हैराण होत्या. लोकलमध्ये खिडकीजवळ बसण्यास जागा त्यांना मिळाली. श्वेता यांना गाढ झोप लागली. ठाणे रेल्वे स्थानक येऊन गेले तरी त्यांंना काही कळले नाही. त्या थेट कसारा रेल्वे स्थानकापर्यंत पोहचल्या. तेथून लोकल कसारा यार्डात गेली. तेथे त्यांना जाग आली. त्यावेळी त्या सुरूवातीला घाबरल्या.
हेही वाचा : ठाणे: बोगस पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ काॅल अन् लूम कामगाराने गमावले पावणे दोन लाख
कसारा येथे पोहचल्याचे लक्षात आल्यावर त्या सावध झाल्या. बटव्यातील मोबाईल, गळ्यातील सोनसाखळी चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. श्वेता यांंनी तातडीने कसारा रेल्वे स्थानकात येऊन तेथून त्या कल्याण रेल्वे स्थानकात आल्या. त्यांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात येऊन घडल्या चोरी प्रकाराची तक्रार करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी कल्याण रेल्वे स्थानकात आशीष जाॅन मकासरे याला अटक केली होती. त्याच्या जवळ एक महागडा मोबाईल, सोनसाखळी होती. हा ऐवज कोठूण आणला आहे याची सविस्तर माहिती आशीष पोलिसांना देत नव्हता. श्वेता लोहमार्ग पोलीस ठाण्यात हजर असताना रेल्वे पोलीस आशीषला पोलीस ठाण्यात घेऊन आले. त्यावेळी आशीष जवळ असलेला ऐवज आपला असल्याचे श्वेताने ओळखले. पोलिसांंनी आशीषवर गुन्हा दाखल करून श्वेता शिंदे यांचा मोबाईल, सोनसाखळी असा दीड लाखाहून अधिक किमतीचा ऐवज परत केला.
© The Indian Express (P) Ltd