कल्याण : टिटवाळा येथे फिरस्त्या महिलेवर भटक्या श्वानांनी हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना ताजी असतानाच, कल्याण येथील बेतुरकरपाडा भागात भटक्या श्वानाने आठ वर्षाच्या एका शाळकरी मुलावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आहे. या मुलावर मुंबईतील शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : दिड वर्षात ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदरला वाढीव पाणी; स्टेम प्राधिकरणाकडून पाणी उचल क्षमता वाढविण्याच्या कामास सुरूवात

बेतुरकरपाडा भागातील शिवाजीनगरमध्ये हा प्रकार घडला. मुलाच्या गुप्तांग आणि तोंडाला भटक्या श्वानाने चावा घेतला. हा मुलगा खासगी शिकवणी वर्गातून संध्याकाळी आपल्या घरी पायी परतत असताना घराजवळील गल्लीत त्याच्या पाठीमागे एक भटका श्वान लागला. त्याने प्रतिकार करण्याच्या आत भटक्या श्वानाने त्याच्या तोंडावर आणि गुप्तांगाला चावे घेतले. भटक्या श्वानाच्या तावडीतून सुटका करून घेऊन तो घाबरलेल्या अवस्थेत घरी परतला. भटका श्वान चावल्याची माहिती त्याने कुटुंबियांना दिली. तातडीने त्याला कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्याला अधिकच्या उपचाराची गरज असल्याने त्याला तेथून कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालय, त्यानंतर शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार करून त्याला घरी सोडण्यात आले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan stray dogs attacked on eight year old boy seriously injured css