कल्याण : कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानकाजवळ भिवंडी येथे जाणाऱ्या रिक्षा वाहनतळावरील एका रिक्षा चालकासह त्याच्या तीन समर्थकांनी चालकाच्या शेजारी बसण्याच्या वादातून एका प्रवाशासह त्याच्या वडील, भाऊ आणि दोन मित्रांना मारहाण केली. तसेच, रिक्षा चालकाच्या समर्थकांनी प्रवाशांवर चाकुने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.
महात्मा फुले पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यातील तक्रारीतील माहिती अशी, की तक्रारदार हे आपल्या कुटुंबीयांसह भिवंडी येथे राहतात. तक्रारदार ग्राफीक डिझायनर आहेत. शुक्रवारी रात्री साडे बारा वाजताच्या दरम्यान तक्रारदार, त्यांचे वडील, भाऊ आणि मित्र हे कल्याण पश्चिमेतील वलीपीर रस्त्यावरील साधना हाॅटेल समोरील रस्त्यावरील भिवंडीकडे जाणाऱ्या रिक्षा वाहनतळावर आले. तेथे त्यांनी भिवंडीला जाण्यासाठीच्या रिक्षा पकडली.
एका प्रवाशाला रिक्षा चालकाने रिक्षा चालका शेजारील आसनावर बसण्यास सांगितले. या बसण्यावरून रिक्षा चालक आणि प्रवासी यांच्या वाद झाला. या वादातून रिक्षा चालकाने प्रवाशाला मारहाण केली. आपल्या मुलाला का मारहाण केली, असे प्रश्न मुलाचे वडील, त्याचा भाऊ आणि दोन मित्रांनी रिक्षा चालकाला केले.
या गोष्टीचा राग येऊन चारही जणांनी संगनमत करून ग्राफीक डिझायनर असलेले व्यावसायिक, त्यांचे वडील आणि भाऊ, मित्र यांना पकडून धक्काबुक्की सुरू केली. अचानक घडलेल्या याप्रकाराने प्रवासी घाबरले. रिक्षा चालकाच्या समर्थकांमधील एका इसमाने जवळील चाकू काढुन प्रवाशांवर चाकुने वार करण्यास सुरूवात केली. प्रवाशांच्या छाती, पोटावर, खांद्यावर वार करून त्यांना जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
प्रवाशाने महात्मा फुले पोलीस ठाण्यात जाऊन मारेकऱ्यांविरुध्द तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांना ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे आणि सहकाऱ्यांना प्रवाशांवर हल्ला झालेल्या भागातील सीसीटीव्ही चित्रण तपासून मारेकऱ्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. रात्रीच्या वेळेत रेल्वे स्थानक भागात अनेक रिक्षा चालक प्रवाशांशी अरेरावी करत असल्याच्या तक्रारी आहेत.