कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील २७ गावांमधील २६ कोटींची कामे घेण्यासाठी राजकीय पाठबळ असलेल्या ठेकेदारांमध्ये जोरदार चढाओढ सुरू होती. यात स्थानिक आणि नामवंत कंपन्या पालिकेने स्पर्धेतून काही कारणे देऊन बाहेर काढल्या होत्या. याविषयी ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रसिद्ध करताच, आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. हे काम स्पर्धात्मक निविदा पद्धतीने करण्यास सांगून या कामाच्या फेरनिविदा मागविण्याचे आदेश विद्याुत विभागाला दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालिकेच्या विद्याुत विभागाने तातडीने या फेरनिविदेची प्रक्रिया पूर्ण केली. यात याआधी डावललेल्या नामवंत विद्याुत कामे करणाऱ्या ठेकेदारांना निविदा भरण्यासाठी संधी देण्यात आली. त्यामुळे यापुढे हे काम स्पर्धात्मक निविदा पद्धतीने काम मिळालेले ठेकेदार करतील. दोन राजकीय वजनदार मंडळींनी शासनस्तरावर वजन वापरून डोंबिवलीजवळील २७ गावांमध्ये पथदिवे बसविण्याच्या कामासाठी २६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता.

हेही वाचा : यंदाचा गणेशोत्सव बचत गटांसाठी आर्थिक फलदायी, विविध वस्तू आणि खाद्यपदार्थ विक्रीतून १५ लाखांहून अधिकची आर्थिक उलाढाल

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कामे होणार असल्याने त्याचे श्रेय घेण्याची व्यूहरचना काही राजकीय मंडळींनी आखली होती. हे काम मर्जीतील ठेकेदाराला मिळेल यादृष्टीने पालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली होती.

या चढाओढीत प्रशासनाने हजारो कोटींची कामे करणाऱ्या नामवंत विद्याुत कंपन्यांना स्पर्धेतून विविध कारणे देऊन बाद केले होते. हे प्रकरण ‘लोकसत्ता’ने उघड करताच, राजकीय ठेकेदारांमध्ये अस्वस्थता पसरली होती. याविषयी निविदा स्पर्धेतून बाद करण्यात आलेल्या बड्या कंपनीच्या एका प्रतिनिधीने आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची भेट घेऊन २७ गावांमधील पथदिवे बसविण्याच्या निविदा प्रक्रियेत सुरू असलेल्या गोंधळाची माहिती दिली. या प्रकरणात संदिग्धता निदर्शनास आल्याने आयुक्तांनी यापूर्वीची निविदा प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश विद्याुत विभागाला दिले.

हेही वाचा : ठाणे: विसर्जन सोहळ्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज, शहरात वाहतूक बदल

२७ गावांमधील पथदिवे बसविण्याच्या कामाची फेरनिविदा मागविण्यात आली. नामवंत कंपन्या या स्पर्धेत आता असतील. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तातडीने कामाचे आदेश देऊन पथदिवे बसविण्याची कामे सुरू केली जातील.

प्रशांत भागवत, कार्यकारी अभियंता विद्युत विभाग
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan tender for street lights at 27 villages css