कल्याण : मद्य सेवन करून बेधुंद झालेल्या कल्याण मधील वडवली गावातील तीन जणांनी गावातील एका मासळी विक्रेत्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर मासळी विक्रेत्याला तीन जणांनी पकडून त्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून मासळी विक्रेत्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न मंगळवारी रात्री वडवली गावात घडला आहे.
रुपेश अशोक सलफे (३०) असे गंभीर जखमी मासळी विक्रेत्याचे नाव आहे. त्याच्यावर कल्याण मधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रवी उर्फ भुऱ्या बाळाराम पाटील, गणेश मारुती पाटील, विकी पाटील अशी आरोपींची नावे आहेत. ते सर्व वडवली गावात तक्रारदार रुपेश सलफे यांच्या शेजारी राहतात. रुपेश यांनी याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
हेही वाचा : ठाणे: गर्दीच्या वेळेव्यतिरिक्त नितीन कंपनी चौकातील सिग्नल कायमस्वरूपी
पोलिसांनी सांगितले, तिन्ही आरोपी मंगळवारी दुपारी वडवली गावात रवी पाटील याच्या ओट्यावर दारू पिण्यासाठी बसले होते. दारू पिऊन ते बेधुंद झाले होते. रवीच्या घरा शेजारी रुपेश सलफे यांचे घर आहे. रुपेश सलफे मासे विक्री करून घरी परतले होते. ते घरातून बाहेर आले. त्यावेळी रवी पाटील याने रुपेशला पाहून अर्वाच्चा भाषेत घाणेरड्या शिव्या देणे सुरू केले. आपण तुम्हाला काहीही केले नाही, तुम्ही मला का शिव्या देता, असे रुपेशने रवीला विचारले. त्यावेळी आरोपी विकी, गणेश यांनी रुपेशला बेदम मारहाण सुरू केली. रुपेशने घरातून धारदार शस्त्र आणून ते रुपेशच्या पोटात खुपसून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. रुपेशला त्याच्या कुटुंबियांनी तिन्ही आरोपींच्या तावडीतून सोडविले. त्याला तातडीने पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे प्रथमोपचार करून रुपेशला कल्याण मधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा : कळवा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराबाहेरपर्यंत रुग्णांच्या रांगा, ‘हे’ आहे कारण
रुपेशला मारहाण केल्यानंतर तिन्ही आरोपी धारदार शस्त्र घेऊन रुपेशच्या घरासमोर आले आणि रुपेश वाचविण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याला जीवे ठार मारले जाईल, असा इशारा वडवलीतील इतर ग्रामस्थांना दिला. या दहशतीने गावातील इतर रहिवाशांनी घराचे दरवाजे बंद करून घरातून बाहेर पडणे टाळले. या तिन्ही आरोपींच्या दहशतीने वडवली गावात भीतीचे वातावरण आहे. गेल्या वर्षभरात वडवली गावात जीवघेणा हल्ल्यांचे दोन ते तीन प्रकार घडले आहेत.