लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण: तुम्हाला आमच्या गावात ट्रक आणण्याची परवानगी नाही. तुमच्याकडे माथाडी कामगाराचा परवाना आहे का, असे प्रश्न करुन कल्याण जवळील सापाड गावातील तीन तरुणांनी शहापूर जवळील लाहे गावातील एका गणपतीच्या कारखाना मालक आणि त्याच्या साथीदाराला बुधवारी रात्री दीड वाजता बेदम मारहाण केली.

या मारहाणीत एकाला गंभीर दुखापत झाली आहे. तुम्ही आमची पोलीस ठाण्यात तक्रार केली तर तुम्ही गणपतीचा कारखाना कसा सुरू करता, ते आम्ही बघतो, अशी धमकी या तरुणांनी कारखाना मालकाला दिली.

कल्याण जवळील उंबर्डे, सापाड परिसरात रात्रीच्या वेळेत मालवाहू ट्रक चालक, पादचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार वाढू लागल्याच्या तक्रारी वाढत आहेत. पोलिसांनी या भागातील रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी व्यावसायिक, ट्रक चालक, मालकांकडून केली जात आहे.

हेही वाचा… शेतकरी संवाद यात्रेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते शुभारंभ; ठाण्यातील टेम्भी नाका येथून प्रारंभ

स्वप्निल वासुदेव पाटील (२७), संजु पाटील (२८) आणि अन्य एक तरुण अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. शहापूर तालक्यातील लाहे गावाजवळील (भातसानगर) गणपती कारखाना मालक हरेश प्रकाश सोनावळे (२४) यांनी या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. कल्याण पश्चिमेतील वाडेघरपाडा येथील सापाड रस्त्यावर हा मारहाणीचा प्रकार घडला आहे.

हेही वाचा… ठाणे महापालिकेचा पर्यावरणपुरक विसर्जनाचा देखावा; राष्ट्रीय हरीत लवादाने पालिकेचे पिळले कान

पोलिसांनी सांगितले, गणपती कारखाना मालक हरेश सोनावळे आणि त्यांचा एक नातेवाईक गणपती तयार करण्यासाठी लागणारी गोण्यांमध्ये भरलेली माती ट्रकमधून घेऊन बुधवारी रात्री दीड वाजता चालले होते. त्यांच्या ट्रकचे एक चाक वाडेघरपाडा सापाडा रस्ता भागात रस्त्याच्या कडेला असलेल्या चिखलात रुतले. ट्रक एका बाजुला कलंडला होता. ट्रकमधील मातीच्या गोण्या बाहेर काढण्याचे काम हरेश आणि त्याचे नातेवाईक, चालक करत होता. यावेळी सापाडा गावातील स्वप्निल, संजु आणि त्याचा साथीदार एक मोटारीतून ट्रकजवळ आले. त्यांनी तुम्ही ट्रक सापडा गावच्या हद्दीत आणलाच कसा. तुमच्या ट्रकला गावात आणण्याची परवानगी नाही. तुम्ही तातडीने ट्रक येथून माघारी न्या. तुमच्या जवळ माथाडी कामगारांचा परवाना आहे का, असे प्रश्न करुन कारखाना मालक हरेश यांच्याशी शाब्दिक वाद घातला.

हेही वाचा… ठाणे, कल्याणमध्ये मुसळधार पाऊस; नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली

आमचा ट्रक मातीत रुतला आहे. तो बाहेर काढला की आम्ही येथून जातो, असे हरेश यांनी तरुणांना सांगितले. त्याचा राग तरुणांना आला. त्यांनी हरेश आणि त्यांचा नातेवाईक यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. कानावर जोराचे फटके बसल्याने एक जण गंभीर जखमी झाला. तुम्ही आमची पोलीस ठाण्यात तक्रार केली तर तुम्ही येथे कारखाना कसा चालविता ते आम्ही बघतो, अशी धमकी देऊन आरोपी तेथून निघून गेले. खडकपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एन. एस. लांडगे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan the owner of ganapati factory was beaten up by the youth of sapad village dvr