कल्याण: टिटवाळा- फळेगाव रस्त्यावरील म्हस्कळ गावातील प्रसिध्द श्री शंकर महाराज मंदीरातील दानपेटी चोरट्यांनी चोरून नेली आहे. या पेटीत सुमारे सात ते आठ हजार रूपये भाविकांनी टाकलेली वाहणावळ होती. टिटवाळा पोलीस ठाण्यात याप्रकरणी मंदिर संस्थानच्या पुढाकाराने तक्रार करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात कल्याण, डोंबिवली परिसरात मंदिरातील दानपेटी चोरीच्या सुमारे सात ते आठ घटना घडल्या आहेत. मंदिरातील दानपेट्या, चांदीच्या पादुका चोरून नेण्याचे प्रमाण वाढल्याने मंदिर संस्थानचे पदाधिकारी त्रस्त आहेत. म्हस्कळ गावातील श्री शंकरनाथ सेवा मंडळ गोरक्षनाथ आखाडा संस्थानचे ॲड. सचीन जगताप अध्यक्ष आहेत. ते कल्याण न्यायालयात वकिली करतात. संस्थानच्या तीन एकर जागेत स्वामी समर्थ, मारूती मंदिर, ध्यान मंदिर, साई बाबा मंदिर, शंकर महाराज मंंदिरे आहेत.
गेल्या रविवारी मंदिराचे पुजारी ओमकार पोतदार यांना सकाळच्या वेळेत मंदिरात सेवा करताना आढळले की मंदिरातील दानपेटी गायब आहे. त्यांनी परिसरात शोध घेतला पेटी आढळली नाही. ही माहिती अध्यक्ष जगताप यांना देण्यात आली. मंदिराचे विश्वस्त मंदिरात जमा झाले. मंदिरातील सीसीटीव्ही चित्रण तपासण्यात आले. त्यावेळी ३० वयोगटातील तीन इसम मंदिरात तोडाला बुरखे बांधून रविवारी मध्यरात्री शिरले असल्याचे दिसून आले. त्यामधील एक जण मंदिरातील दानपेटी मंदिरा बाहेर घेऊन जाताना दिसत आहे. चोरट्यांनी दानपेटी चोरल्याचे स्पष्ट झाल्याने विश्वस्तांंनी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पाळत ठेऊन ही चोरी केली असण्याचा संशय विश्वस्तांना आहे. टिटवाळा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.