कल्याण : ऑनलाईन जंगली रमीचा (जुगार) नाद पूर्ण करण्यासाठी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोन्याचा ऐवज, रोख रक्कम लुटणाऱ्या एका चोरट्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे कौशल्याने अटक केली आहे. त्यांच्याकडून सात लाखाहून अधिकचा चोरीचा सोन्याचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. रोख रक्कम त्यांनी जंगली रमी खेळण्यावर उधळली आहे.
योगेश चव्हाण असे चोरट्याचे नाव आहे. योगेश हा पुण्यातील चाकण तालुक्यातील रहिवासी आहेत. योगेश चव्हाण याची चौकशी करताना त्याला ऑनलाईन जंगली रमी खेळण्याचा नाद असल्याचे समोर आले. ही हौस पूर्ण करण्यासाठी लागणारे पैसे तो एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा सोने, रोख रक्कम चोरायचा. किमती ऐवज ते विकून टाकायचा. त्या माध्यमातून मिळणारा पैसा तो जंगली रमी खेळण्यासाठी वापरायचा असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सोलापूर येथील एक प्रवासी राहुल सोनी सोलापुर ते कल्याण रेल्वे स्थानक हा सिध्देश्वर एक्सप्रेसने कुटुंबासह प्रवास करत होते. त्यांच्या आईने जवळील सोन्याचा किंमती ऐवज, रोख रक्कम असा बटवा त्यांनी आसनांच्या बाजुला असलेल्या आधार फळीवर ठेवला होता. त्या माढा ते कल्याण या प्रवासात झोपी गेल्या होत्या. ही संधी हेरून चोरट्याने सोनी यांच्या आईचा आसना समोरील आधार फळीवर ठेवलेला ऐवज असलेला बटवा चोरला. तो पसार झाला.
कल्याण रेल्वे स्थानक येण्यापूर्वी राहुल सोनी यांच्या आईला जाग आली. त्यांना आपण सात लाखाहून अधिक रकमेचा सोन्याचा ऐवज, रोख रक्कम असलेला बटवा समोरील फळीवरून गायब असल्याचे दिसले. धावत्या एक्सप्रेसमध्ये चोरीची शक्यता नसताना ऐवज चोरीला गेल्याने सोनी कुटु्ंबीय हैराण झाले.
कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात सोनी कुटुंबीयांनी चोरीची तक्रार केली. कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांनी मुंबई गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली या चोरी प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी माढा ते कल्याण रेल्वे स्थानकांदरम्यानचे रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही चित्रण तपासले. या तपासात एका इसमाने ही चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्या इसमाची ओळख पटवली. तो पुणे जिल्ह्यातील चाकण तालुक्यातील असल्याचे पोलिसांना समजले. योगेश चव्हाण असे त्याचे नाव असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांना अटक केली. पोलीस निरीक्षक रोहीत सावंत, साहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश खाडे, उपनिरीक्षक प्रकाश चौगुले, हवालदार रवींंद्र ठाकुर, स्मिता वसावे, लक्ष्मण वळकुंडे, अजय रौंधळ, राम जाधव, हितेश नाईक, वैभव जाधव, अक्षय चव्हाण आणि इतर यांच्या पथकाने ही कारवाई केली.