कल्याण – कल्याण पूर्वेतील लोकधारा सह्याद्री भागात राहत असलेल्या एका ५४ वर्षाच्या शिक्षकाची एका महिलेने सोन्याच्या गुंतवणुकीतून १० ते २० टक्के वाढीव नफा मिळवून देते, असे आमिष दाखवून शिक्षकाची ६६ लाख १० हजार रूपयांची गेल्या महिनाभराच्या कालावधीत फसवणूक केली आहे. या शिक्षकाने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

याप्रकरणात अद्याप कोणाला अटक करण्यात आली नाही, असे पोलिसांनी सांगितले. शिक्षकाने दाखल केलेल्या प्राथमिक तपासणी अहवालातील माहिती अशी, की गेल्या महिन्यात या शिक्षकाला एका महिलेकडून फेसबुक मित्र होण्याची विनंती करणारी जुळणी पाठविण्यात आली. या शिक्षकाने होकार दर्शवून मित्र होण्याची विनंती मान्य केली. मित्र झालेल्या महिलेने एक बीअरस्टीर संकेतस्थळाची जुळणी शिक्षकाला पाठविली. आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहात का, असे प्रश्न केले. आपण सोन्याच्या माध्यमातून गुंतवणूक केली तर आपणास १० ते २० टक्के नफा आपण गुंतवणुकीच्या माध्यमातून मिळवून देऊ, असे आमिष दाखविले.

या शिक्षकाच्या विश्वास संपादन केल्यानंतर फसवणूक करणाऱ्या महिलेने आपल्या जवळील दोन मोबाईलच्या माध्यमातून शिक्षकाशी ऑनलाईन संवाद साधण्यास सुरूवात केली. सोन्यामधील गुंतवणुकीसाठी महिलेने शिक्षकाला दिलेल्या बँक खात्यामध्ये रक्कम वळती करण्यास सांगितले. अल्पावधीत झटपट अधिकचा परतावा मिळतो म्हणून शिक्षकाने टप्प्याने ७ फेब्रुवारी ते २९ मार्च २०२५ या कालावधीत एकूण ६६ लाख १० हजार रूपये महिलेने दिलेल्या बँक खात्यावर वळते केले.

एवढी मोठी रक्कम गुंतवणूक केल्यावर शिक्षकाने महिलेकडे गुंतवणूक रकमेवरील नफा मागण्यास सुरूवात केली. विविध कारणे देऊन महिलेने वाढीव नफा देण्यास टाळाटाळ सुरू केली. वाढीव नफा मिळत नसल्याने शिक्षकाने आपली गुंतवणुकीची मूळ ६६ लाख १० हजाराची रक्कम परत करण्यासाठी महिलेकडे तगादा लावला. महिला शिक्षकाला दाद देत नव्हती. त्यानंतर महिलेने शिक्षकाच्या संपर्काला प्रतिसाद देणे बंद केले आणि फसवणूक करणाऱ्या महिलेने जवळील दोन्ही फोन बंद करून टाकले.

महिलेने आपली सोन्याच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यावर शिक्षकाने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलिसांनी माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

या महिलेचे तांत्रिक माहितीच्या आधारे मोबाईलच्या माध्यमातून ती सध्या कोठे वास्तव्य करत आहे. कोठे लपून बसली आहे. आणि शिक्षकाने महिलेच्या कोणत्या बँक खात्यावर रक्कम वळती केली आहे, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. गेल्याच आठवड्यात डोंबिवलीत पांडुरंगवाडी भागात एका सेवानिवृत्ताची भामट्यांनी लाखो रूपयांची ऑनलाईन माध्यमातून फसवणूक केली आहे. डोंबिवली पश्चिमेत एक पर्यटन कंपनी चालक, तीन खासगी गुंतवणूक सल्लागारांनी गुंतवणूकदारांची कोट्यवधीची रुपयांची फसवणूक केली आहे.