कल्याण : गेल्या महिन्यापूर्वी कल्याण वाहतूक विभागातील प्रवीण गोपाळे हे वाहतूक पोलीस एका माल वाहतूकदार व्यावसायिकाकडून पाचशे रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले होते. ही ताजी घटना असताना बुधवारी सकाळी कल्याण वाहतूक शाखेतील वाहतूक सेवक (वाॅर्डन) एका वाहन चालकाकडून दोन हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला.
या सततच्या प्रकरणांमुळे कल्याण वाहतूक शाखेतील वाहतूक पोलीस रस्त्यावर वाहतूक नियोजनासाठी उभे असतात की लाचखोरीसाठी उभे असतात असे प्रश्न वाहन मालक, चालकांकडून उपस्थित केले जात आहेत. वैभव युवराज शिरसाट (२६) असे लाच स्वीकारताना सापडलेल्या वाहतूक सेवकाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेश जागडे यांच्या पथकाने ही अटकेची कारवाई केली. महात्मा फुले पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महात्मा फुले पोलीस ठाण्यातील तक्रारीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे, की कल्याण रेल्वे स्थानक भागात एका वाहन चालकाने नियमबाह्य पध्दतीने आपली दुचाकी उभी केली होती. ही दुचाकी वाहतूक विभागाने कल्याण वाहतूक शाखेत जमा केली होती. ही दुचाकी सोडविण्यासाठी दुचाकी वाहन मालकाकडे वाहतूक पोलीस यांनी वाहन मालकाकडे तीन हजार रूपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम दोन हजार रूपये देण्याचे ठरले होते. याप्रकरणी वाहन मालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संपर्क पडताळणीत वाहतूक पोलीस लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले होते.
बुधवारी सकाळी दुचाकी वाहन मालक वाहतूक शाखेत आपले वाहन सोडविण्यासाठी आला होता. त्यावेळी वाहतूक सेवक वैभव शिरसाट यांनी तडजोडीअंती तीन हजार रूपयांऐवजी दोन हजार रुपये स्वीकारण्याचे कबुल करून कल्याण शहर वाहतूक शाखेच्या बाहेरील सार्वजनिक रस्त्यावर वाहन मालकांकडून दोन हजार रुपये जमा वाहन सोडविण्यासाठी स्वीकारले. त्याचवेळी सापळा लावून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वैभव शिरसाट यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पथकाने सुरू केला आहे.
दरम्यान, वाहतूक सेवकांना दरमहा पाच हजार रूपये मानधन आहे. हे मानधन पाच ते सहा महिने मिळत नाही. ते वाढवुनही मिळत नाही. त्यामुळे वाहतूक सेवक वाहन मालकांकडून चिरीमिरी घेत असल्याची माहिती आहे. पालिकेकडून वाहतूक सेवकांना दरमहाचे मानधन दिले जाते. हे मानधन अनेक वर्षांपासून वाढविण्यात आलेले नाही आणि ते वेळेवर मिळत नाही, अशा वाहतूक सेवकांच्या तक्रारी आहेत.