कल्याण: कल्याण शिळफाटा रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलीस दररोज संध्याकाळी दोन्ही मार्गिकांमधून एकाच दिशेने वाहने सोडतात. या कालावधीत समोरून दोन्ही मार्गिकांमधून येणारी वाहने काही अंतरावर वाहतूक पोलिसांंकडून किमान १५ मिनिटे रोखून धरली जातात. वाहतूक पोलिसांच्या या मनमानी नियोजनामुळे काही दिवसांंपासून शिळफाटा रस्त्यावर पुन्हा वाहन कोंडी होऊ लागली आहे.
शिळफाटा रस्त्यावर वाहने धावण्याचा वेग सर्वाधिक आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहने धावती असली की वाहन कोंडी होत नाही. वाहतूक नियोजनाच्या नावाने कोळसेवाडी वाहतूक विभागाचे पोलीस काटई नाका, खिडकाळी, देसई हद्दीत संध्याकाळच्या वेळेत कल्याणकडून शिळफाटा दिशेने येणारी वाहने रोखून धरतात. त्याचवेळी शिळफाटा दिशेने जाणारी वाहने दोन्ही मार्गांमधून एकाच वेळी सोडतात. या वाहनांची रांग संंपली की मग कल्याणकडे येणारी रोखून धरलेली वाहने दोन्ही मार्गिकांमधून सोडली जातात. किमान पंधरा मिनिटे वाहने रोखून धरण्याच्या या प्रकरामुळे शिळफाटा रस्त्यावर दररोज वाहन कोंडी होऊ लागली आहे.
हेही वाचा : स्नॅपचॅट डाऊनलोड करण्यास वडिलांनी विरोध केल्याने डोंबिवलीत तरूणीची आत्महत्या
वाहतूक नियोजनाच्या या अजब नियोजनामुळे प्रवासी त्रस्त आहेत. शिळफाटा रस्त्यावरून दोन्ही बाजुने सतत वाहने धावत असली तर वाहन कोंडी या रस्त्यावर होत नाही. वाहने एकाच जागी रोखून धरण्याच्या प्रकारामुळे खिडकाळी, काटई, निळजे, मानपाडा, शिळफाटा रस्त्याचे पोहच रस्त्यांवरील वाहने अडकून पडतात.
संध्याकाळच्या वेळेत नोकरदार, शाळकरी विद्यार्थी घरी परतत असतात. त्यांना या कोंडीचा सर्वाधिक फटका बसतो. मुंबई, नवी मुंबईतून यापूर्वी खासगी वाहनाने शिळफाटा रस्त्यावरून घरी सात ते साडे सात वाजता पोहचणारा प्रवासी आता साठे ते नऊ वाजता पोहचत आहे. साडे सहा वाजता घरी पोहचणारे विद्यार्थी शाळेच्या बस वाहन कोंडीत अडकत असल्याने सात ते साडे सात वाजता घरी पोहचत असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत.
हेही वाचा : डोंबिवलीत क्लिनरने बेदरकारपणे टेम्पो चालविल्याने वस्तू वितरक तरूणाचा मृत्यू
वाहतूक पोलिसांनी वाहने रोखून धरण्याची पध्दत बंद करून शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक धावती ठेवावी, अशी प्रवाशांची मागणी आहे. अधिक माहितीसाठी कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचीन सांडभोर यांना संपर्क केला, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
मोबदला नाही
कल्याण शिळफाटा रस्त्यालगतच्या ११ गावांमधील रस्ते बाधित शेतकऱ्यांंना शासनाने गे्ल्या तीन महिन्यापूर्वी सुमारे ३५० कोटीचा मोबदला जाहीर केला आहे. हा मोबदला अद्याप शेतकऱ्यांंना वाटप करण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांनी मोबदला मिळाल्याशिवाय शिळफाटा रस्ता रुंदीकरणासाठी जमीन न देण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे काटई, निळजे, मानपाडा, कोळे गाव हद्दीतील रस्तारूंदीकरण अद्याप रखडले आहेत. लोकसभेची आचारसंंहिता लागू होण्यापूर्वी शासनाने रस्ते बाधितांना भरपाईची रक्कम जाहीर केली होती. आता आचारसंहिता संपली आहे ही रक्कम तातडीने शेतकऱ्यांना वितरित करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
हेही वाचा : विधानसभा निवडणुकीत लोक तुमच्या डोळ्यात अंजन घालतील, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
शिळफाटा ररस्त्यावर दोन्ही मार्गिकांमधील वाहने एकाचवेळी किमान १५ मिनिटे रोखून धरली जातात. यामुळे शिळफाटा मुख्य रस्त्यासह अंतर्गत पोहच रस्त्यावर कोंडी होत आहे. नोकरदार, विद्यार्थी यांना या कोंडीचा फटका बसत आहे.
नरेश पाटील (रहिवासी, काटई)