कल्याण : कल्याण पूर्व सिध्दार्थनगरमध्ये रेल्वे स्थानकाजवळील स्कायवाॅक परिसरात गुरुवारी पहाटे तीन वाजता दोन जणांनी एका भाजी विक्रेत्याबरोबर भांडण करून त्याच्यावर दगडाने हल्ला केला. त्यांच्या जवळील भाजी खरेदीसाठीची सहा हजार रूपयांची रोख रक्कम आणि मोबाईल लुटून नेला होता. याप्रकरणी भाजी विक्रेत्याने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
करण संदेश समुद्रे (२२), दीपेश रमेश पांचाळ (२७) अशी अटक करण्यात आलेल्या मारेकऱ्यांची नावे आहेत. ते कल्याण पूर्वेतील सिध्दार्थनगर, हनुमाननगर कोळसेवाडी भागात राहतात.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की गुरुवारी पहाटे तीन वाजताच्या दरम्यान भाजी विक्रेता सुरेश बहादूर (२०) हे कल्याण पूर्व भागातून कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानकाजवळील लक्ष्मी घाऊक भाजी बाजारात भाजी खरेदीसाठी पायी चालले होते. ते कल्याण पूर्व भागात कुटुंबीयांसह राहतात. कल्याण पूर्व रेल्वे स्थानकाजवळील सिध्दार्थनगर भागातून रेल्वे स्कायवाॅकच्या दिशेने जात असताना सुरेश यांना यांना दोन जणांनी हाक मारून थांबविले.
दोघांनी अचानक सुरेश यांच्याशी वाद घालून त्यांच्यावर दगडाने हल्ला चढविला. अचानक घडलेल्या याप्रकाराने भाजी विक्रेता सुरेश बहादूर घाबरले. पहाटेची वेळ असल्याने तेथे इतर पादचारी नव्हते. दोघांनी सुरेश यांच्यावर हल्ला करत असताना त्यांना पकडून त्यांच्या जवळील भाजी खरेदीसाठी जवळ असलेली सहा हजार रूपयांची रोख रक्कम आणि त्यांचा मोबाईल हिसकावून दोघेही पळून गेले. दगडाचे घाव वर्मी बसल्याने भाजी विक्रेता सुरेश जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
भाजी विक्रेत्याने याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांनी तातडीने याप्रकरणाचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले. सिध्दार्थनगर रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही चित्रण पोलिसांनी तपासले. त्यामध्ये दोन जण सुरेश यांना लुटत असल्याचे दिसून आले. सीसीटीव्ही चित्रणातील दोघांची ओळख पोलिसांनी पटवली. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी करण समुद्रे, दीपेश पांचाळ यांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील लुटलेली सहा हजार रूपयांची रोख रक्कम व मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. या दोघांनी असे काही गुन्हे यापूर्वी केले आहेत का या दिशेने पोलीस तपास करत आहेत.
साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप भालेराव, दर्शन पाटील, हवालदार राजेश कापडी, मिलिंंद बोरसे, भागवत सौंदाणे, विलास जरग, सचिन कदम, वाघ, दिलीप सोनावळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.