कल्याण – कल्याण पश्चिमेतील मोहने येथील एका घरात घरगुती गॅस सिलिंडरचे रेग्युलेटर बसवत असताना गॅस सुरू झाला. यावेळी स्फोट आणि आगीचा भडका उडून घरातील दोन जण होरपळले होते. गेल्या महिन्यात ही घटना घडली होती. गंभीर जखमींवर मुंबईत शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना दोन्ही जखमींचा मृत्यू झाला. त्रिशा पवन पारवे (९, रा. तांडेल इमारत, महात्मा फुले नगर, मोहने), विजय गणपत तांडेल (५६, रा. मोहने ) अशी मृत व्यक्तिंची नावे आहेत. खडकपाडा पोलीस ठाण्यात या दोन्ही मृत्यु प्रकरणाच्या नोंदी पोलिसांनी दाखल केल्या आहेत.

पोलीस ठाण्यातील तक्रारीप्रमाणे, वैशाली तांडेल यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आपले पती गेल्या महिन्यात सकाळी साडे सात वाजता घराच्या शेजारी राहत असलेल्या अनिता पारवे यांच्या घरातील घरगुती गॅस सिलिंडरचे रेग्युलेटर बसविण्यासाठी गेले होते. रेग्युलेटर बसवून गॅस सुरू केला असता, गॅस घरात पसरला. गॅसचा भडका उडाला. या आगीच्या भडक्यात कुटुंबप्रमुख अनिता पारवे, त्यांची मुलगी, विजय तांडेल हे गंभीररित्या भाजले. शेजारील रहिवाशांनी विजय तांडेल यांना पालिकेच्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथील डाॅक्टरांनी त्यांना शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्याची सूचना केली. विजय यांच्यावर घटना घडल्यापासून उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती नंतर खालावली. ७ मार्च रोजी त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

याच घटनेत गंभीर जखमी झालेली त्रिशा पवन पारवे (९) हिच्यावर लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्रिशाचा १३ मार्च रोजी मृत्यू झाला. या मृत्यूप्रकरणी मयत मुलीच्या वडिलांनी पवन पारवे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. या दोन्ही मृत्युप्रकरणाची माहिती लोकमान्य टिळक रुग्णालय प्रशासनाकडून प्राप्त झाल्यानंतर खडकपाडा पोलिसांनी या दोन्ही मृत्युप्रकरणाची नोंद करून घेतली आहे. या मृत्युप्रकरणी कोणावरही संशय नसल्याचे दाखल नोंदीत दोन्ही तक्रारदारांनी म्हटले आहे.

Story img Loader