कल्याण : रेल्वेमध्ये नोकरीला लावतो, असे सांगून येथील एका कुटुंबातील सदस्य, संशयास्पद रेल्वे अधिकाऱ्यांनी संगनमत करून रायगड जिल्ह्यातील रोहा येथील एक रहिवासी आणि इतर बेरोजगार तरूणांची एकूण सुमारे ७४ लाख ४० हजार रूपयांची फसवणूक केल्याची तक्रार महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रारदाराकडून दाखल करण्यात आली आहे. जानेवारी ते मे या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. फसवणूक झालेल्या रोहा येथील एका व्यक्तिने याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार केली. पोलिसांनी प्राथमिक तपासणी अहवाल नोंदवून घेतला आहे.
तक्रारदाराने पोलीस ठाण्यातील तक्रारीत चिकणघर भागातील एका कुटुंबातील चार सदस्य, संशयास्पद तीन रेल्वे अधिकारी आणि एक वैद्यकीय अधिकारी या संशयितांविरुध्द तक्रार दाखल केली आहे. पोलीस ठाण्यातील तक्रारीतील माहिती, अशी, तक्रारदाराचा मुलगा बेरोजगार असल्याने त्यांना नोकरीची गरज होती. तक्रारदाराची ओळख गुन्हा दाखल संशयास्पद व्यक्तिंबरोबर झाली. या नऊ व्यक्तिंमधील काही जण हे रेल्वे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी असल्याचे तक्रारदाराला भासविण्यात आले.
हेही वाचा : कल्याण : बाह्यवळण रस्ते मार्गातील अटाळी येथील १२५ बांधकामे जमीनदोस्त
गुन्हा दाखल संशयित व्यक्तिंनी तक्रारदाराला रेल्वेत आमची ओळख असुन आम्ही रेल्वेते विविध पदावर आम्ही नोकरी मिळवून देऊ शकतो असे आमिष तक्रारदाराला दाखविले. आता रेल्वे भरती प्रक्रिया सुरू आहे असे सांगितले. या आमिषाला बळी पडून तक्रारदाराने आपल्या मुलासाठी आणि इतर बेरोजगार तरूणांनी रेल्वेत नोकरी मिळते या अपेक्षेने गुन्हा दाखल व्यक्तिंच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. गुन्हा दाखल कुटुंबीयांमधील एका सदस्याने कथित रेल्वे अधिकाऱ्यांची तक्रारदाराची भेट घालून दिली. तक्रारदार आणि इतर बेरोजगार तरुणांकडून गुन्हा दाखल व्यक्तिंनी नोकरी लावण्याच्या बदल्यात ७४ लाख ४० हजार रूपये विविध बँक खात्यावर जमा करून घेतले. तक्रारदारासह बेरोजगार तरूणांना नोकरी लावण्याचे बनावट ईमेल, नियुक्ती पत्रे संशयास्पद रेल्वे अधिकाऱ्यांनी पाठविली.
हेही वाचा : बेदरकार ट्रकने चिरडल्याने एकाचा मृत्यू; बदलापूर येथील घटना, चालक ताब्यात
आपणास मिळालेली नियुक्ती पत्रे बनावट असल्याचे समजल्यावर तक्रारदारसह तरूणांनी पैसे परत मिळण्यासाठी गुन्हा दाखल व्यक्तिंकडे तगादा लावला. त्यांच्याकडून पैसे परत मिळण्याची शक्यता नसल्याने आपली फसवणूक झाली म्हणून तक्रारदाराने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले, याप्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. अद्याप कोणाला अटक केलेली नाही.