कल्याण: कल्याण पूर्व, पश्चिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बारावे येथील जलशुध्दीकरण केंद्राची जलवाहिनी मंगळवारी रात्री शहाड येथे फुटली. वाहिनी फुटल्याने शेकडो लीटर पाणी फुकट गेले. जलवाहिनी लगतचा परिसर जलमय झाला होता. कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन दुरुस्तीच्या कामाचे नियोजन केले.
मध्यरात्री जलवाहिनी फुटल्याने काळोखात दुरुस्तीचे काम करणे अवघड होते. तसेच जलवाहिनीतील पाण्याच्या प्रवाहाला उच्चतम वेग असल्याने हे पाणी तात्काळ थांबविणे अशक्य होते. जोपर्यंत जलवाहिनीतील पाणी खाली होत नाही, तोपर्यंत पालिका पाणी पुरवठा अधिकारी, ठेकेदार यांना दुरुस्तीचे काम हाती घेणे शक्य नव्हते. सकाळी सहा वाजताच्या दरम्यान जलवाहिनीतील पाण्याचा वेगवान प्रवाह कमी झाल्यानंतर तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.
हेही वाचा : ठाणे स्थानकात चिखल, राडारोडा, गोण्यांच्या ढिगांमुळे प्रवाशांची कसरत; पुलांवर गर्दुल्ले, भिक्षेकऱ्यांचे ठाण
जलवाहिनी फुटल्याचा कल्याण पूर्व, पश्चिम भागातील पाणी पुरवठ्यावर मंगळवारी संध्याकाळपर्यंत परिणाम होईल, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. मध्यरात्रीपासून पालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी जलवाहिनीतील पाण्याची पातळी कधी खाली होते यासाठी फुटलेल्या जलवाहिनी भागात ठिय्या देेऊन होते. उल्हास नदीतून शहाड येथे पाणी उचलून ते बारावे येथे जलशुध्दीकरण केंद्रात आणले जाते.
हेही वाचा : ठाणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता
जलवाहिनीतील अतिउच्चत दाबामुळे किंवा व्हाॅल्व्हमध्ये तांत्रिक बिघाड झाला की अशा घटना घडतात, असे अधिकारी म्हणाला. जलवाहिनीतील पाण्याची पातळी सकाळी सहा वाजता कमी झाल्यानंतर पालिका अधिकारी, ठेकेदाराने जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण केले. कल्याण शहराला पाणी टंचाईची झळ बसणार नाही यादृष्टीने तात्काळ जलवाहिनीतून पाणी पुरवठा सुरू केला. सकाळच्या वेळेत कल्याण शहराला पाणी पुरवठा झाला नसला तरी आता दुपार आणि संध्याकाळी नियमित पाणी पुरवठा होईल, असे अधिकारी म्हणाला.