कल्याण : डोंबिवली शहराला पाणी पुरवठा करणारी १४०० इंचाची जलवाहिनी गुरूवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील दीपक हाॅटेल परिसरात फुटली. या भागात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उड्डाण पूल उभारणीचे काम सुरू आहे. हे काम करत असताना एका अवजड उखळणी (ड्रील) यंत्राचे धारदार टोक जलवाहिनीत घुसले. जलवाहिनीतून शेकडो लीटर पाणी बाहेर फेकले गेले. यामुळे कल्याण न्यायालय, तहसीलदार कार्यालय परिसर जलमय झाला.
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील दीपक हाॅटेल, कल्याण न्यायालय ते सम्राट चौकाच्या दरम्यान पालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पूल उभारणीचे काम सुरू आहे. ही कामे करताना जमिनीत खोलवर छिद्र पाडण्याची कामे अवजड उखळणी यंत्राने सुरू आहेत. या भागात पालिकेच्या जलवाहिन्या कुठे आहेत याची माहिती, नकाशे ठेकेदारांना दिले आहेत. तरीही अशाप्रकारे जलवाहिनी दोन वेळा या भागात ठेकेदाराकडून फोडण्यात आली. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हे प्रकार घडत आहेत, असे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.
गुरूवारी मध्यरात्री जलवाहिनी फुटल्याची माहिती यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता राजू राठोड यांनी पाणी पुरवठा देखभालीचे ठेकेदार संजय शहा यांना दिली. शहा यांनी तातडीने उल्हास नदीवरील मोहिली येथे जाऊन तेथील उदंचन केंद्रातील डोंबिवलीला पाणी पुरवठा करणारे पंप बंद केले. हे पाणी नेतिवली टेकडी येथे जलशुध्दीकरण केंद्रात नेले जाते.
हेही वाचा : स्वच्छ स्थानकाचा पुरस्कार मिळालेल्या ठाणे स्थानकात अस्वच्छता
फुटलेल्या जलवाहिनीतील पाणी लवकर खाली करण्यासाठी आश्यक त्या उपाययोजना पहाटेपर्यंत करण्यात आल्या. मोहिली उदंचन केंद्रातून वेगवान प्रवाहाने येणारे पाणी आणि नेतिवली टेकडीवरून चढावामुळे पाठीमागे येणारे पाणी यामुळे सकाळपर्यंंत खराब झालेल्या जलवाहिनीतील पाण्याची पातळी कमी झाली नव्हती. दिवसा हा प्रकार घडला असता तर मोठा अनर्थ झाला असता, असे प्रत्यक्षदर्शिने सांगितले.
तांत्रिक अडचण
जलवाहिनीतील पाण्याची पातळी कमी होत नाही. तोपर्यंत त्या भागात लोखंडाची जोडणी (वेल्डिंग) करता येत नाही. घाईने काम केले तर जोडणी पाण्याच्या दाबाने उडण्याची शक्यता आहे. वाहिनीतील पाण्याची पातळी पाच इंचाने कमी झाली की तुटलेल्या भागात जोडणी करणे शक्य होणार आहे, असे ठेकेदार बंटी शहा यांनी सांगितले.
हेही वाचा : धूर फवारणीत बदलापूर पालिकेची ८१ लाखांची फसवणूक; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून कंपनीवर गुन्हा दाखल
संध्याकाळपर्यंत पाणी सुरळीत
आता फुटलेल्या जलवाहिनीतून नेतिवली जलशुध्दिकरणाच्या माध्यमातून डोंबिवली पूर्व, पश्चिम भागाला पाणी पुरवठा केला जातो. रात्री दीड वाजल्यापासून डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा बंद राहिल्याने दिवसभर डोंबिवली शहराला पाणी पुरवठा होणार नाही. जलकुंभांमध्ये पाणी नसल्याने टँकरव्दारे पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही. जलवाहिनीतील पाण्याची पातळी कमी झाली की तातडीने वाहिनीचा फुटलेला भाग काढून त्या ठिकाणी नवीन वाहिनीचा तुकडा लावण्यात येणार आहे, असे शहा यांनी सांगितले.
हेही वाचा : डोंबिवलीत उमेशनगरमध्ये जलवाहिनीच्या व्हाॅल्व्हवर झाकण नसल्याने अपघात
“ फुटलेल्या जलवाहिनीतील पाण्याची पातळी कमी होऊन शुक्रवार दुपारपर्यंतपर्यंत नवीन वाहिनी जोडण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर पुन्हा पंप सुरू करून नेतिवली जलशुध्दीकरण केंद्रात पाणी आले की ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत डोंबिवलीतील जलकुंभांमध्ये सोडण्याचे नियोजन आहे. शुक्रवारी संध्याकाळपासून नागरिकांना पाणी उपलबध होईल.” – शैलेश मळेकर, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग.