कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेची एक जलवाहिनी सोमवारी सकाळी पत्रीपुलाजवळील ९० फुटी रस्त्यावर फुटली. जलवाहिनीतून शेकडो लीटर पाणी वाहून गेले. कल्याण पूर्व भागाला या जलवाहिनीतून पाणी पुरवठा केला जातो. जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळतात या जलवाहिनीवरील पाणी पुरवठा पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी बंद केला.
जलवाहिनीतून बाहेर पडणारे पाणी ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावर साचले होते. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर जलवाहिनीतून पाण्याचे कारंजे उडत असल्याने वाहन चालकांना या भागातून वाहने चालविताना काळजी घ्यावी लागत होती. अनेक वाहन चालकांनी जलवाहिनीजवळ आपली वाहने उभी करून उडणाऱ्या पाण्याद्वारे आपली वाहने धुऊन घेतली.
हेही वाचा : जिल्ह्यातला पारा घसरला, बदलापुरात सर्वात कमी १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
उल्हास नदी पात्रातून उचललेले पाणी बारावे जलशुध्दीकरणात आणले जाते. तेथून हे पाणी जलवााहिनीव्दारे पत्रीपूल भागात रेल्वे मार्गाखालून कल्याण पूर्व भागात पुरवठा केले जाते. ही जलवाहिनी सोमवारी सकाळी ९० फुटी रस्त्यावरील मोहन सृष्टी येथे फुटली. जलवाहिनीतून शेकडो लीटर पाणी फुकट गेले. परिसरातील जागरूक नागरिकांनी ही माहिती तात्काळ पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर या जलवाहिनीतून होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला.
ही जलवाहिनी फुटल्यामुळे कल्याण पूर्वेतील पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होणार आहे. नागरिकांनी घरातील उपलब्ध पाणी एक दिवस जपून वापरण्याचे आवाहन पालिका अधिकाऱ्यांनी केले आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम अधिकाऱ्यांनी तातडीने सुरू केले होते. दुपारपर्यंत हे काम पूर्ण करून या जलवाहिनीतील पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा : ज्ञानसाधनाची ‘कुक्कुर’ एकांकिका अंतिम फेरीत
या जलवाहिनीच्या परिसरात राहणारे काही रहिवासी जलवाहिनीतून पाण्याचा ओघ कमी झाल्यानंतर भांडी घेऊन पाणी भरण्यासाठी आले होते. जलवाहिनीतील पाण्याच्या अति उच्चदाबामुळे जलवाहिनी फुटली असण्याचा प्राथमिक अंदाज अधिकारी वर्तवत आहेत. दुरुस्ती करत असताना जलवाहिनी फुटण्याचे खरे कारण समजून येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.
९० फुटी रस्त्यावर पत्रीपुल भागात जलवाहिनी फुटली आहे. या जलवाहिनीवरील पाणी पुरवठा तातडीने बंद करण्यात आला आहे. ही जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेऊन कल्याण पूर्व भागाचा पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल.
अशोक घोडे (कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग)