कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेची उल्हास नदी काठच्या मोहिली येथील जलशुध्दीकरण केंद्राची कल्याण पश्चिमेतील शहाड, रामबाग, बिर्ला महाविद्यालय परिसर, जोशीबाग, मिलिंदनगर परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला सोमवारी मध्यरात्री दीड वाजता गळती सुरू झाली आहे. या गळतीमुळे पुरेशा दाबाने कल्याण पश्चिमेच्या काही भागाला पाणी पुरवठा होणार नसल्याने पश्चिमेतील काही भागाचा पाणी पुरवठा सोमवारी मध्यरात्रीपासून पाणी पुरवठा विभागाने बंद केला आहे.
मोहिली येथील जलशुध्दीकरण केंद्रातून कल्याण पश्चिमेच्या भोईरवाडी, बिर्ला महाविद्यालय रस्ता, शहाड, मिलिंदनगर, सह्याद्रीनगर, योगीधाम, सिंडीकेट, चिकणघर, कल्याण पूर्वेतील अशोकनगर, शिवाजीनगर, पश्चिम परिसराला मुख्य जलवाहिनीवरून सुमारे २० दशलक्ष लीटर दररोज पाणी पुरवठा केला जातो. या मुख्य जलवाहिनीला सोमवारी मध्यरात्री अचानक गळती सुरू झाली.
या जलवाहिनीतून पाण्याची गळती सुरू झाल्याने पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता नव्हती. रात्रभर गळतीच्या माध्यमातून पाणी फुकट जाणार होते. त्यामुळे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी ठेकेदाराच्या साहाय्याने सोमवारी रात्रीच गळती होणाऱ्या मुख्य जलवाहिनीचा पाणी पुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी बंद केला. रात्रीतून गळती होत असलेल्या भागाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले.
या दुरुस्तीच्या कालावधीत शहाड परिसर, रामबाग, कल्याण पूर्वच्या काही भागाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आल्याने मंगळवारी सकाळी बाधित परिसराला पाणी पुरवठा झाला नाही. सकाळी नेहमी सात ते आठच्या दरम्यान पालिकेच्या मुख्य जलवाहिनीतून घरामध्ये येणारे पाणी मंगळवारी सकाळी न आल्याने रहिवाशांची पळापळ झाली. सकाळी कामावर जाण्याची गडबड, मुलांची शाळेत जाण्याची धावपळ, त्यात सकाळच्या वेळेत पाणी न आल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा : कल्याण पत्रीपूल येथे मोटारीच्या धडकेत तीन विद्यार्थी गंभीर जखमी
गेल्या काही दिवसांपासून दुरुस्ती, अचानकचे तांत्रिक बिघाडमुळे पालिकेचा पाणी पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. गेल्या आठवड्यात कांबा येथील महावितरणच्या वीज वाहिनीत बिघाड झाल्याने मोहिली येथील उदंचन, जलशुध्दीकरण केंद्रांचा पाणी पुरवठा बंद पडला होता. पश्चिमेतील वसंत व्हॅली, आधारवाडी परिसरात काही दिवसापूर्वी पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. कल्याण, डोंबिवली शहरांच्या इतर भागांचा पाणी पुरवठा मात्र सुरळीत सुरू असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.