कल्याण – कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांना उमेदवारी जाहीर केली तर या मतदारसंघात इच्छुक असलेले शिवसेनेचे शहरप्रमुख रवी पाटील, भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार बंडखोरी करण्याची शक्यता आहे. ही बंडखोरी टाळण्यासाठी शिवसेनेने या मतदारसंघातील उमेदवार पहिल्या यादीत जाहीर केला नसल्याचे समजते.
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळावी म्हणून मागील दोन सत्रापासून (टर्म) शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील प्रयत्नशील आहेत. शिवसेना एकसंध असताना कल्याण पश्चिमेतून यापूर्वी विजय साळवी, सचिन बासरे, रवी पाटील, अरविंद मोरे यांनी उमेदवारीची मागणी केली होती. या इच्छुकांना एकावेळी उमेदवारी देणे शक्य नसल्याने मातोश्रीवर त्यावेळी झालेल्या पक्षप्रमुखांच्या बैठकीत समझोत्याचा उमेदवार म्हणून त्यावेळचे शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांना उमेदवारीची लाॅटरी लागली होती.
हेही वाचा >>>लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू ; अंबरनाथ बदलापूर स्थानकादरम्यानची घटना
भोईर यांच्या उमेदवारीमळे आपणास उमेदवारी मिळाली नाही, अशी खंत कल्याण पश्चिमेतील शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांमध्ये आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्याने कल्याण पश्चिमेतील शिवसेनेत दुभंग निर्माण झाला. त्यामुळे आता अशाप्रकारची तडजोड स्वीकारण्यास कल्याण पश्चिमेतील शिंदे शिवसेनेतील इच्छुक तयार होण्याची शक्यता नाही. मागील दहा वर्षापासून उमेदवारीच्या प्रतीक्षेत असलेले शिवसेनेतील इच्छुक उमेदवारी मिळाली नाहीतर शांत राहण्याची शक्यता नाही. त्यामुळे शिंदे शिवसेनेने दूरदृष्टीचा विचार करून कल्याण पश्चिमेतील पहिल्या उमेदवार यादीत उमेदवार जाहीर केला नाही.
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळावी म्हणून शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील सक्रिय आहेत. खानदेशी समाजासह इतर समाजाचे जनसंघटन करण्यास ते यशस्वी झाले आहेत. कल्याणमधील मेट्रो मार्ग खडकपाडा बिर्ला महाविद्यालयमार्गे वळवून घेण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. याशिवाय विकास प्रकल्प शहरात आणणे यासाठी त्यांनी शासन पातळीवर प्रयत्न केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खास मर्जीतले शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे.
हेही वाचा >>>दारू सोडविण्यासाठी आलेल्या रुग्णांना मारहाण; कल्याणमधील अनधिकृत नशामुक्ती केंद्राचा अमानुष कारभार
अशा परिस्थितीत घाईने कल्याण पश्चिमेचा उमेदवार म्हणून विश्वनाथ भोईर यांना जाहीर केले तर रवी पाटील यांच्याकडून बंडखोरी होण्याची भीती असल्याने शिवसेनेने कल्याण पश्चिमेचा उमेदवार जाहीर करताना हात आखडता घेतला असल्याचे समजते. भोईर यांच्या कार्यअहवाल प्रकाशनाला पाटील यांनी पाठ फिरवली होती.
पाटील यांच्या बंडखोरीची शक्यता असताना दुसरीकडे याच मतदारसंघात भाजपचे नरेंद्र पवार उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. पाटील, पवार हे दोघेही महायुतीचे कल्याण पश्चिमेतील बलस्थान आहेत. उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शहरप्रमुख सचिन बासरे, साईनाथ तारे यांची नावे आघाडीवर आहेत. कल्याण पश्चिमेतील निष्ठावान शिवसैनिक उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. विश्वनाथ भोईर यांना उमेदवारी जाहीर केली आणि पवार, पाटील यांनी बंडखोरी केली तर शिंदे शिवसेनेला त्याचा फटका बसू शकतो. या भीतीने पहिल्या यादीत कल्याण पश्चिमेचा उमेदवार शिवसेनेने जाहीर केला नसल्याचे समजते.
आपणास उमेदवारी मिळावी म्हणून भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कार्यकर्ते म्हणतील त्याप्रमाणे आपण उमेदवारीसंदर्भात भूमिका घेणार आहोत.- नरेंद्र पवार,माजी आमदार,भाजप.
कल्याण पश्चिम शहर वाढतेय, या शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. त्या दूरदृष्टीचे नेतृत्वाची आता शहराला गरज आहे. त्यामुळे पक्षाने विचार केला तर आपण उमेदवारीसाठी सज्ज आहोत.- रवी पाटील, शहरप्रमुख, शिवसेना.