कल्याण : आपणास अर्धवेळ नोकरी मिळेल, असे आश्वासन देऊन कल्याण मधील संतोषनगर भागातील एका नोकरदार तरूणीला चार भामट्यांनी ऑनलाईन माध्यमातून आश्वासन दिले. या तरूणीला ऑनलाईन माध्यमातून भामट्यांनी दिलेल्या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागल्या. या प्रक्रिया करताना भामट्यांनी तरूणीकडून १० लाख ५१ हजार रूपये परत देण्याच्या बोलीवर वसूल केले. त्यानंतर वसूल केलेली रक्कम परत न करता तरुणीची फसवणूक केली. सप्टेंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. प्रिशा, दिशा, आदिती आणि नारायण पटेल अशी फसवणूक करणाऱ्या भामट्यांची नावे आहेत. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फसवणूक झालेल्या तरूणीने तक्रार केली आहे.

पोलिसांनी सांगितले, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आरोपींनी तक्रारदार तरुणीला टेलिग्राम उपयोजनव्दारे संपर्क साधला. तुम्हाला अर्धवेळ नोकरी देण्यास आम्ही इच्छुक आहोत, असे सांगितले. या कामासाठी तुम्हाला अन्य व्यक्ति संपर्क करतील. त्याप्रमाणे तुम्ही पुढील प्रक्रिया पार पाडा असे सांगितले. नियमित नोकरी बरोबर अर्धवेळ नोकरी मिळणार असल्याने तरुणीने भामट्यांच्या इशाऱ्याप्रमाणे पुढील प्रक्रिया पार पाडण्यास सुरूवात केली. हवाई जहाज नोंदणीचे काम फक्त तुम्हाला करायचे आहे. यासाठी पहिले तुम्हाला काही टास्क दिले जातील ते तुम्ही पूर्ण करायचे आहेत. हे टास्क आणि नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जी काही रक्कम भरणा करणार आहेत ती तुम्हाला वाढीव रकमेसह परत मिळेल, असे आश्वासन भामट्यांनी तरुणीला दिला. तरुणीचा विश्वास संपादन करून आरोपींनी तरुणीकडून १० लाख ५१ हजार रूपये टप्प्याने वसूल केले.

हेही वाचा : कल्याणमध्ये १२५ किलो बनावट तूप, लोणी जप्त; बाजार परवाना विभागाची कारवाई

नोंदणीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तरुणीने अर्धवेळ नोकरी आणि भरणा केलेली रक्कम वाढीव रकमेसह परत देण्याची मागणी आरोपींकडून सुरू केली. वर्षभर ते या तरूणीला विविध कारणे देऊन रक्कम देण्यास टाळाटाळ करत होते. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर आरोपी आपणास रक्कम परत करत नाहीत आणि अर्धवेळ नोकरीही देत नाहीत, त्यामुळे त्यांनी आपली फसवणूक केली आहे. याची खात्री पटल्यावर तरूणीने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील तपास करत आहेत.