कल्याण : येथील चिंचपाडा भागातील एका तरूणीची एका भामट्याने ऑनलाईन व्यवहारातून ८८ हजार ५०० रूपयांची फसवणूक केली आहे. गेल्या महिन्यात हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी तरुणीने महिनाभर उशीराने म्हणजेच सोमवारी तक्रार दिली असून त्याआधारे कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नीलम दुबे अशी फसवणूक झालेल्या तरूणीचे नाव आहे. ती शिक्षण घेत आहे. पोलिसांनी सांगितले, गेल्या महिन्यात तक्रारदार तरूणी नीलम दुबे सायंकाळच्या वेळेत अंधेरी ते घाटकोपर दरम्यान मेट्रोने प्रवास करत होती. यावेळी तिच्या मोबाईलवर एका अज्ञाताच्या मोबाईलवरून एक जुळणी (लिंक) आली. ही जुळणी कसली आहे म्हणून तिने ती उघडली. तरूणीचा मोबाईल क्रमांक बँक खात्याशी संलग्न असल्याने तरूणीने जुळणी (लिंक) उघडताच भामट्याने तिच्या बँक खात्यामधील ३९ हजार रूपये आणि पाठोपाठ ४९ हजार ५०० रूपये चलाखीने स्वत:च्या बँक खात्यात वळते केले.

हेही वाचा : उद्धव ठाकरे व्यंगचित्रातून रावण रूपात; शिवसेनेच्या व्यंगचित्रातून थेट उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

ही रक्कम ॲमेझाॅनच्या खात्यात जमा झाल्याचा लघुसंदेश तरूणीला आला. आपण कोणत्याही वस्तुची खरेदी केली नाही तरी, आपल्या बँक खात्यामधून अचानक ८८ हजार ५०० रूपये कसे वळते झाले असा प्रश्न तक्रारदाराला पडला. एवढी मोठी रक्कम खात्यामधून वळती झाल्याने तरूणी अस्वस्थ झाली. तिने काही दिवसांनी बँकेत जाऊन चौकशी केली. त्यावेळी तिला भामट्याने ऑनलाईनद्वारे ही फसवणुक केल्याचे समोर आले. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. बँकेत जाऊन चौकशी करण्यास विलंब झाला. त्यामुळे तक्रार दाखल करण्यास उशीर झाला आहे, असे तिने तक्रारीत म्हटले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan young girl cheated for rupees 88 thousand css
Show comments