लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: येथील एका तरुणाने धारदार चार सुरे जवळ बाळगत या चारही सुऱ्यांबरोबरची एक दृश्यचित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित केली. तसेच या सुऱ्यांसोबतचे आपले छायाचित्र स्वताच्या व्हाॅट्सअॅप स्टेटसवर स्थापित केले. समाज माध्यमांवरील तरुणाची दृश्यचित्रफित पाहून कोळसेवाडी पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. या तरुणाला सूचकनाका भागातून आज अटक केली.
प्रदीप यादव (२५) असे या तरुणाचे नाव आहे. तो कल्याण पूर्वेतील सूचकनाका भागात राहतो. त्याने एवढे चार धारदार सुरे कोठून आणले. रात्रीच्या वेळेत तो हे सुरे घेऊन कोठे जाणार होता, याचा तपास पोलीस करत आहेत. या तरुणाने धारदार शस्त्रांची छबी समाज माध्यमांवर का प्रसारित केली. तो कोणाला इशारा होता का, अशा चारही बाजुने पोलीस हे प्रकरण हाताळत आहेत.
हेही वाचा… डोंबिवलीत बेकायदा इमारतीत व्यायाम शाळा सुरू करण्याचा प्रयत्न, पालिकेचा फौजदारी कारवाईचा इशारा
कल्याण, डोंबिवली परिसरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी समाज माध्यमांवरील हालचालींवर करडी नजर ठेवली आहे. या पाळतीवरुन हा गंभीर प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. प्रदीप रात्रीच्या वेळेत एकटाच चार धार सुऱ्यांची धार पाहत ते संग्रहित करत आहे, अशी दृश्यचित्रफित समाज माध्यमावर प्रसारित झाली. कोळसेवाडी पोलिसांनी या तरुणाचा शोध सुरू केला. हा तरुण कल्याण पूर्व भागातील असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी कोळसेवाडी भागातील सूचकनाका भागातून या तरुणाला तांत्रिक माहितीच्या आधारे अटक केली.
पूर्ववैमनस्यातील वादाचा बदला घेण्यासाठी अनेक तरुण अशाप्रकारचा घातक शस्त्रांचा वापर करत आहेत. गेल्या आठवड्यात देवतेची बदनामी करण्यावरुन अटाळी, आंबिवली, वाडेघऱ् भागातील २० तरुणांच्या गटाने एका अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केली होती. त्यामुळे पोलीस आता अधिक सतर्क झाले आहेत.