कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील घनकचरा विभागाच्या चार स्वच्छता अधिकाऱ्यांना शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे भोवले असून घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी त्यांची वार्षिक वेतनवाढ रोखण्याची कठोर कारवाई केली आहे. प्रभागातील सार्वजनिक स्वच्छतेकडून दुर्लक्ष करणे, सफाई कामगारांवर योग्य ते नियंत्रण न ठेवणे आणि कचऱ्याविषयीच्या तक्रारींचा निपटारा न करणे, असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. मोहनिष गडे, शरद पांढ रे, अर्जुन वाघमारे, प्रशांत गायकवाड अशी या चार अधिकाऱ्यांची नावे आहेत.
मागील तीन वर्षात प्रथमच एवढी आक्रमक कारवाई स्वच्छता अधिकाऱ्यांवर करण्यात आल्याने घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कल्याण-डोंबिवली शहरे कचरामुक्त, प्लास्टिक मुक्त करणे याासाठी पालिकेकडून मागील तीन वर्षापासून विविध उपक्रम स्वच्छतेसाठी राबविले जात आहेत. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेविषयीचे उपक्रम नियमित पालिका हद्दीत राबविले जात आहेत. घनकचरा विभागातील प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याने आपली कामातील सिध्दता दाखवून स्वच्छ कल्याण डोंबिवली प्रकल्प यशस्वी करायचा आहे. स्वच्छ भारत अभियानात केंद्र सरकारच्या यादीत प्रथम क्रमांकाने येण्यासाठी पालिकेचे प्रयत्न आहेत. असे असताना कल्याणमधील एक स्वच्छता निरीक्षक, एक स्वच्छता अधिकारी आणि याच संवर्गातील डोंबिवलीतील दोन अधिकारी कामात चालढकलपणा करत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या, असे अधिकाऱ्याने सांगितले.
प्रत्येक स्वच्छता निरीक्षक, अधिकाऱ्याने आपल्या प्रभागातील कोठेही सार्वजनिक ठिकाणी कचरा पडणार नाही याची दक्षता घेण्याचे उपायुक्त पाटील यांचे आदेश आहेत. हा कचरा उचलण्यासाठी प्रत्येक प्रभाग, घर, गल्ली, झोपडपट्टी भागात घंटागाडीचे नियोजन केले आहे. रात्रीचा कचरा उचलण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत कल्याण, डोंबिवलीतील एकूण चार स्वच्छता अधिकारी कामात चालढकलपणा करत आपल्या प्रभागातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत आल्याचे घनकचरा विभागाच्या निदर्शनास आले होते. त्यांना वारंवार कार्यक्षमता दाखविण्याच्या आणि कामात सुधारणा करण्याचे सूचित करण्यात आले होते. वारंवार सूचना करूनही या चारही अधिकाऱ्यांच्या कामात कोणतीही प्रगती होत नसल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली असून त्यांची वार्षिक वेतनवाढ रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उपायुक्त पाटील यांनी दिली.
हेही वाचा… कंटेनर बंद पडल्याने मुंबई नाशिक महामार्गावर कोंडी
“ कल्याण-डोंबिवली शहरे कचरामुक्त करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे्त. हे माहिती असुनही घनकचरा विभागातील काही अधिकारी कामात निष्काळजीपणा करत होते. पूर्वसूचना देऊनही त्यांच्या कामात सुधारणा न झाल्याने त्यांची वार्षिक वेतनवाढ रोखण्यात आली आहे.” – अतुल पाटील, उपायुक्त, घनकचरा विभाग