ठाणे : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मागील २० दिवसांत जिल्ह्यात ७३ हजार ६११ मतदारांची नवीन नोंद झाली आहे. तर लोकसभा निवडणूकीपासून आतापर्यंत ४ लाख २८ हजार ९५ मतदारांची वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीत लिंग गुणोत्तर ८४८ होते, ते आता ८८० पर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे महिला मतदारांची नोंदणी करण्यास प्रशासनाला यश आल्याचे दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात प्रशासनाकडून मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले होते. लोकसभा निवडणूकी दरम्यान प्रशासनाने राबविलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत ६८ लाख १ हजार २४४ इतकी होती. त्यानंतरही आयोगाच्या सूचनेनुसार विशेष संक्षिप्त आढावा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीत ३ लाख ५४ हजार ४८४ नवीन मतदारांनी वाढ झाली होती. जिल्हा प्रशासनाच्या वतीने १६ ऑक्टोबरला नव्याने मतदार यादीबाबतची माहिती प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये १८ विधानसभा मतदार संघात ७१ लाख ५५ हजार ७२८ मतदारांची नोंदणी झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. यामध्ये ३८ लाख १३ हजार २६४ पुरुष आणि ३३ लाख ४१ हजार ७० महिला तसेच १ हजार ३९४ इतर मतदारांचा समावेश आहे.

हेही वाचा…भिवंडीत निवडणूक भरारी पथकाकडून दोन कोटीची रक्कम जप्त

विधानसभा निवडणूकीचे मतदान २० नोव्हेंबरला होणार आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मंगळवारी नवीन यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये ७३ हजार ६११ नवीन मतदारांची वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. अवघ्या २० दिवसांत हे मतदार वाढले आहे. त्यामुळे मतदारांची संख्या ७२ लाख २९ हजार ३३९ इतकी झाली आहे. यामध्ये ३८ लाख ४५ हजार ४२ पुरूष आणि ३३ लाख ८२ हजार ८८२ महिला तसेच १ हजार ४१५ इतरांचा सामावेश आहे. १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या आता १ लाख ७२ हजार 1 लाख 72 हजार ९८१ इतकी झाली आहे. तर दिव्यांग मतदारांची संख्या ३८ हजार १४९ असून ८५ वर्षांवरील मतदारांची संख्या ५६ हजार ९७९ इतकी झाली आहे.

हेही वाचा…रुपेश म्हात्रेंची माघार, तरीही पक्षातून हकालपट्टी; पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केलेली टीका भोवल्याची चर्चा

ओवळा माजिवडा मतदारसंघात सर्वाधिक मतदार

जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार हे ओवळा-माजिवडा मतदारसंघातील आहे. या क्षेत्रात ५ लाख ४५ हजार ११० मतदार आहेत. तर सर्वात कमी मतदार उल्हासनगर विधानसभा क्षेत्रात आहेत. येथे २ लाख ८३ हजार ३७९ मतदार आहेत.

ठाणे जिल्ह्यात ६ हजार ९५५ मतदान केंद्र आहेत. यात ६ हजार ८९४ मूळ मतदान केंद्र असून ६१ साहाय्यकारी मतदान केंद्र आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In last 20 days 73 611 new voters registered in thane district ahead of assembly elections sud 02