महाराष्ट्राचे लाडके बाबुजी अर्थात सुधीर फडके, आई ललिता आणि पुत्र श्रीधर फडके या फडके कुटुंबाचा सांगीतिक वाटचालीचा आढावा घेणारा भव्य दिव्य असा ‘पुन्हा सुलश्री’ कार्यक्रम रविवारी सकाळी येथे सादर करण्यात आला. बाबुजींचे सूर कानावर पडले की तारुण्य पुन्हा हाती गवसल्याचा आनंद प्रत्येकाला होतो. त्याच आनंदाची प्रचीती डोंबिवलीकरांनी या कार्यक्रमातून पुन्हा एकदा घेतली.
स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समिती डोंबिवलीच्या वतीने सुधीर फडके यांच्या तेराव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने लोकाग्रहास्तव तब्बल एक तपानंतर डोंबिवलीत ‘पुन्हा सुलश्री’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सकाळी येथील सावित्रीबाई फुले नाटय़गृहात हा कार्यक्रम पार पडला. बाबुजींची गाणी आजही रसिक श्रोत्यांना सुखावून जातात, याचा प्रत्यय नाटय़गृहातील रसिकांची जमलेली गर्दी पाहून येत होता. कार्यक्रमाची सुरुवात शिष्यवृत्तीची मानकरी पूर्वा बापट हिने सादर केलेल्या शिव पंचाक्षरी या भरतनाटय़म नृत्य प्रकाराने झाली.
देव देव्हाऱ्यात नाही, सखी मंद झाल्या तारका, धुंदी कळ्यांना, तोच चंद्रमा नभात, दिवसामागूनी दिवस चालले, झाला महार पंढरीनाथ, नीजरूप दाखवा हो, एकवार पंखावरूनी, सांज ये गोकुळी, हा माझा मार्ग एकला, कानडा राजा पंढरीचा, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, संथ वाहते कृष्णामाई ..यांसारखी अवीट गाणी श्रीधर फडके यांनी सादर केली. तसेच आई ललिता देऊळकर -फडके यांनीही बाबुजींना भक्कम साथ देत त्यांना मदत केली. शास्त्रीय संगीत गायनावर त्यांचा जास्त भर होता असे सांगत, मोठं मोठं डोळं, त्यात कोळ्याच जाळं, रंगु बाजारला जाते ओ जाऊ द्या तसेच ठुमरी रागातील त्यांचे मी तर प्रेम दिवाणी हे गीत शिल्पा पुणतांबेकर यांनी सादर केले आणि ललिताजींच्या संगीत प्रवासाला उजाळा दिला. बाबुजी-ललिताताई यांच्या गाण्यांमागील किस्से, भूमिका तसेच आपल्या गीतांच्या जन्मकथा सांगत श्रीधरजींनी सुलश्री संस्मरणीय केला.
त्यांना साथसंगत शेफाली कुलकर्णी, दीपा सावंत, धवल भागवत (गायन), तुषार आंग्रे (तबला), संदिप कुलकर्णी (बासरी), विनय चेऊलकर (सिंथेसायझर), सूर्यकांत सुर्वे (तालवाद्य) यांनी केली. तर हेमंत बर्वे यांचे ओघवते निवेदन एक वेगळीच रंगत आणून गेले.
कार्यक्रमा दरम्यान यंदाची स्वरतीर्थ शिष्यवृत्ती धारक पूर्वा बापट हिला भरतनाटय़ममधील यशासाठी प्रदान करण्यात आली. पाच वर्षांसाठी प्रतिवर्ष १२ हजार रुपये असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे. तसेच नूपुर काशीद, स्वप्नील भिसे, अमृता लोखंडे, अवधूत फडके, रेश्मा कुलकर्णी यांनाही शिष्यवृत्ती बहाल करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा