भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील नागरिकांच्या गंभीर आजारांवर मोफत उपचार करता यावे म्हणून महापालिका आणि राज्य शासनाच्या संयुक्त पुढाकाराने नाट्यगृहाशेजारी शंभर खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. येत्या २३ जानेवारी २०२४ रोजी याचे लोकार्पण करणार असल्याचे पालिकेकडून जाहिर करण्यात आले आहे.
काशिमीरा येथील महापालिकेच्या नाट्यगृह शेजारी हे रुग्णालय उभारण्यात आले आहे. या इमारतीची निर्मिती महापालिकेने विकासकाला विकास हक्क प्रमाणपत्र देऊन केली आहे. तळ मजला अधिक तीन असे या इमारतीचे बांधकाम असून यास ‘मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक’ असे नाव देण्यात आले आहे. या इमारतीच्या अंतर्गत सजावटीसाठी राज्य शासनाकडून २५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे आता जवळजवळ ९० टक्के रुग्णालय उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यानुसार ठाणे येथील गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालयाच्या धर्तीवर याठिकाणी १०० खाटांचे हे रुग्णालय चालवण्याचा संयुक्त निर्णय महापालिका आणि राज्य शासनाने घेतला आहे.
हेही वाचा : …तर स्वच्छतेसाठी पंतप्रधान मोदींनी झाडू मारायचा का?
यात एका सामाजिक संस्थेला हे रुग्णालय सांभाळण्याची जबाबदारी सोपावली जाणार आहे. यामध्ये केसरी आणि पिवळ्या शिधा पत्रिका धारकांवर राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य विमा योजने अंतर्गत मोफत उपचार दिले जाणार आहेत. त्यामुळे रुग्णालय व्यवस्थापन व इतर गोष्टींचा संपूर्ण खर्च त्या माध्यमातून उचलला जाणार आहे. त्यानुसार येत्या २३ जानेवारी २०२४ रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक आणि पालिका आयुक्त संजय काटकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.
हेही वाचा : पैसे दे नाहीतर अश्लिल छायाचित्र प्रसारित करेन; मालकीनीला धमकावून खंडणी उकळणाऱ्या लेडिज टेलरला अटक
रुग्णालयात या सुविधा मिळणार
मीरा भाईंदर मध्ये नव्याने सुरु होणाऱ्या ‘मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक’ रुग्णालयात आयसीयू, पोस्ट ऑपरेटिव्ह आयसीयू, एसी जनरल बेड आणि कॅज्युअल्टी बेडसह शंभर खाटा असणार आहेत. याशिवाय ओपीडी सेवा दिली जाणार आहे. ज्यात रक्त तपासणी, हेमॅटोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री टेस्ट, ईसीजी, सोनोग्राफी, होल्टर, पीएफटी, एक्स-रे, केयूव्ही, सीटी स्कॅन स्क्रीनिंग होईल. तसेच बऱ्याच शस्त्रक्रिया करण्याची सोय असणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.