भाईंदर : मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीत एकूण १८३ बांधकामे ही अनधिकृत आहेत. प्रशासनाने केलेल्या प्रभाग निहाय सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे अशा बांधकामांची यादी महापालिकेने पहिल्यांदाच संकेत स्थळावर प्रसिद्ध केली असून नागरिकांना या पासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मीरा भाईंदर हे झपाट्याने वाढणारे शहर आहे. त्यामुळे दिवसेंदिवस येथील घरांचे, दुकानांचे आणि जागेचे दर हे वाढत आहेत. याशिवाय वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील सुख-सुविधांमध्ये देखील भर पडू लागली आहे. याच गोष्टीचा गैरफायदा उचलत काही विकासक तसेच भुमाफिया शहरात अनधिकृत बांधकाम करत आहेत. अशा बांधकामामुळे शहर विकासात बाधा निर्माण होत असून गरीब नागरिकांची देखील आर्थिक फसवणूक होत आहे.

हेही वाचा : भाईंदर : सहा महिन्यात नवे बस थांबे व विश्रांती कट्याची दुरवस्था

शहरातील अनधिकृत बांधकामांवर रोख आणण्यासाठी महापालिकेच्या स्थापनेपासूनच अतिक्रमण विभागाची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय प्रभाग अधिकाऱ्यांना आपल्या प्रभागात कारवाईचे स्वतंत्र आदेश देण्यात आले आहे. मात्र मागील काही वर्षांत प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आपल्या कामाकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे शहरात अनधिकृत बांधकामांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अशा अस्तित्वात असलेल्या बांधकामामुळे सामान्य नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून यांची यादी महापालिकेमार्फत प्रसिद्ध करण्याचे शासन आदेश आहेत. मागील एकवीस वर्षांत प्रशासनाने ही यादी जाहिर करण्याकडे कानाडोळा केला होता. परंतु पालिका आयुक्त पदी संजय काटकर यांनी पदभार स्विकारल्यानंतर प्रथमच पालिकेच्या संकेत स्थळावर ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार शहरात सद्य स्थितीत सहा प्रभागात एकूण १८३ बांधकामे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : कल्याणमध्ये सापाड गावातील रस्ता रूंदीकरणातील बांधकामे हटवली

अनधिकृत बांधकामांवर दंडात्मक कारवाई

मीरा भाईंदर शहरातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेमार्फत कारवाई केली जाते. यासाठी प्रशासनाचे मनुष्य बळ व सामग्री खर्ची करावी लागते. त्यामुळे हा भुर्दंड अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांकडूनच वसूल करावा, असा शासकीय ठराव करण्यात आला आहे. त्यानुसार यापुढे हा दंड वसुल केला जाणार असल्याची माहिती आयुक्त संजय काटकर यांनी दिली आहे.

अनधिकृत बांधकामाची प्रभाग निहाय यादी.

प्रभाग क्रमांक १ – ६
प्रभाग क्रमांक २ – १
प्रभाग क्रमांक ३ – ७८
प्रभाग क्रमांक ४ – ३२
प्रभाग क्रमांक ५ – ०८
प्रभाग क्रमांक ६- ५८

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mira bhaindar city 183 illegal constructions list published by the municipal corporation css