बदलापूर येथील एका शाळेत १४ वर्षाच्या मुलीचा शाळेतील शिक्षकानेच विनयभंग केल्याची संतापजनक घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. याप्रकरणी बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यांनी अधिक चौकशी केली असती ही शाळाच अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. या शाळेवर आता कारवाई करण्यात आली असून शाळेतील दुसरी ते दहावी पर्यंतच्या वर्गांना टाळे ठोकण्यात आले आहे. तर येथील विद्यार्थ्यांना पालकांच्या संमतीने शहरातील एका मान्यताप्राप्त शाळेत प्रवेश देण्यात आले आहेत. यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बदलापूर पश्चिमेच्या एका खासगी शाळेत एका १४ वर्षीय मुलीचा शिक्षकानेच विनयभंग केल्याची घटना पाच दिवसांपूर्वी समोर आली होती. मुलीने या संदर्भात पालकांकडे तक्रार केली असता पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर संबंधित शिक्षकाला अटक करून त्याच्यावर पोक्सो आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने यांची गांभीर्याने दखल घेऊन आयोगाच्या सदस्य नीलिमा चव्हाण यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे आणि संबंधित शाळेत भेट देऊन माहिती घेतली. यावेळी शाळेत केलेल्या तपासणीत शाळेचे वर्ग अनधिकृत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या शाळेला फक्त इयत्ता पहिलीपर्यंत परवानगी होती. मात्र शाळेत दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग भरत असल्याचे समोर आले होते. शिशुवर्ग ते दहावी या इयत्तांमध्ये शाळॆत १६९ विद्यार्थी शिकत होते. शाळाच अनधिकृत असल्याने येथील इतर विद्यार्थ्यांना आणि पालकांसमोर मोठे संकट उभे राहिले होते. मात्र मुलांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी जिल्हा महिला बालविकास विभाग, पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग यांची शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांसमवेत नुकतीच बैठक पार पडली. यावेळी दुसरी ते दहावीतील सर्व विद्यार्थ्यांना शहरातीलच एका मान्यताप्राप्त शाळेत प्रवेश घेऊन देण्यात आले आहेत.
बालहक्क संरक्षण आयोगाच्या वतीने शाळेला भेट दिली असता प्राथमिक अहवालात शाळेला पहिलीपर्यंत मान्यता असल्याचे दिसून आले होते. यानुसार विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये त्यांची शाळा सुरळीत सुरु राहावी यासाठी दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मान्यताप्राप्त शाळेत प्रवेश देण्यात आले आहे. तर संबंधित अनधिकृत शाळेवर कारवाई करण्यात आली आहे. – पल्लवी जाधव, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी