ठाणे : महायुतीच्या जागावाटपात बहुचर्चीत ठाणे लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदरात पडताच, ठाणे आणि कल्याण या दोन्ही मतदारसंघातील शिंदे गटाच्या उमेदवारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थ या निवास्थानी भेट घेतली. मुंबई, ठाणे, कल्याण या मतदारसंघात राज ठाकरे यांनी सभा घ्याव्यात असे साकडेही त्यांना यावेळी घालण्यात आले. निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ठाणे आणि कल्याणात महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी राज ठाकरे स्वत: सभा घेतील असा दावा मुख्यमंत्ऱ्यांचे पुत्र खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरलेली ठाणे लोकसभेची जागा अखेर शिंदे गटाला मिळाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. ठाण्यातून नरेश म्हस्के तर कल्याण लोकसभा मतदारसंघातून डाॅ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली. कल्याण लोकसभा मतदारसंघ डाॅ. श्रीकांत शिंदे लढविणार होते हे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. असे असले तरी ठाण्याचा तिढा सुटत नसल्याने शेवटच्या क्षणी यामध्ये काही फेरबदल होतात का याकडे सर्वाचे लक्ष लागून होते. ठाणे आणि नाशिकच्या जागेचा जोपर्यंत निकाल लागत नाही. तोपर्यंत कल्याणची उमेदवारी जाहीर करू नये अशी भूमिका मुख्यमंत्ऱ्यांनी घेतली होती. दरम्यान मायुतीच्या चर्चेत ठाणे शिंदे यांच्याकडे सोडले जाईल हे दोन ते तीन दिवसांपूर्वीच स्पष्ट झाले होते. मात्र येथून कोणाला उमेदवारी द्यावी याची स्पष्टता नव्हती. अखेर बुधवारी सकाळी पक्षाकडून माजी महापौर नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
हेही वाचा : डोंबिवलीतील प्रवाशाचा दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान मृत्यू
राज ठाकरे यांची भेट
मुंबईसह ठाणे आणि कल्याण पट््ट्यात राज ठाकरे यांना मानणारा एक वर्ग आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात राजू पाटील यांच्या रूपाने मनसेचा एकमेव आमदार असून ते यापूर्वीच श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकीत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अविनाश जाधव यांना ७४ हजार मते मिळाली होती. भाजप उमेदवार संजय केळकर यांच्यावर नाराज असलेल्या शिवसैनिकांनी अविनाश जाधव यांना मतांची रसद पुरविल्याचीच्र्ची त्यावेळी रंगली होती. असे असले तरी ठाणे आणि कल्याणात राज यांना मानणारा मतदार अधिक प्रमाणात आहे. उमेदवारी जाहीर होताच, शिंदे गटाच्या दोन्ही उमेदवारांनी शिवतीर्थ येथे धाव घेत राज यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या. राज्यभर सुरू असोल्या महायुतीच्या सभामध्ये अजूनही राज ठाकरे यांनी सहभाग घेतला नव्हता. ठाणे कल्याणात मात्र राज सभा घेतील असा दावा श्रीकांत शिंदे यांनी केला. यासाठी आम्ही साकडे घातले होते. त्यास त्यांनी मान्यता दिली असे शिंदे यांनी सांगितले.