ठाणे : मुंब्रा येथे एका १० वर्षीय मुलीची हत्या करुन तिचा मृतदेह इमारतीच्या डक्ट भागामध्ये फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय असून पोलिसांनी या प्रकरणी एका १९ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.मुंब्रा येथे १० मजली इमारत आहे. या इमारतीमध्ये सोमवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास एका १० वर्षीय मुलीचा मतदेह आढळला होता.
घटनेची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाल्यानंतर मुंब्रा पोलीस, अग्निशमन दलाचे बचाव पथक आणि अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या मृलीचा मृतदेह डक्टमधून बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेला. सुरुवातीला या मुलीचा मृत्यू डक्टमध्ये पडून झाला असावा असा कयास बांधला जात होता. परंतु हत्या झाल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी मुंब्रा येथेच राहणाऱ्या एका १९ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरु आहे. त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शवविच्छेदन अहवालानंतर हे स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, याप्रकरणात आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. १० वर्षांच्या चिमुरडीची हत्या झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. ज्या ठिकाणी मृतदेह आढळला, तिथे ही मुलगी राहत नव्हती अशी माहिती पोलिसांनी दिली. या मुलाने तिची हत्या का केली आणि कशी केली याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. संबंधित तरुणा विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाल्यास भारतीय न्याय संहितेचे कलमानुसार देखील कारवाई होणार आहे.
महिन्याभरापूर्वी कळवा, मुंब्ऱ्यात तीन हत्या मुंब्रा, शिळडायघर आणि कळवा भागत मागील महिन्यात तिघांची वेगवेगळ्या प्रकरणांत हत्या झाली होती. त्यानंतर आता चिमुरडीच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे. महिन्याभरापूर्वी झालेल्या हत्येत दोघांची गळा चिरुन हत्या झाली होती. तर एकाची डोक्यात दगड घालून हत्या झाली होती. मुलीच्या हत्येनंतर पुन्हा एकदा मुंब्रा शहर चर्चेत आले आहे. मुलीच्या हत्येप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून आरोपीविरोधात कायदेशीर कारवाईस सुरुवात होणार आहे.