डोंबिवली : पोलीस उपायुक्तांचे अंमली पदार्थ विरोधी पथक आणि विष्णुनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री जुनी डोंबिवली शिवमंदिर परिसरात कारवाई करून एका गांजा तस्कराला अटक केली. हा तस्कर जुनी डोंबिवली भागातील रहिवासी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या तस्कराकडून २३ हजार रूपये किंमतीचा गांजा पोलीस पथकाने जप्त केला आहे.
अमित पांडुरंग शिंदे (४२, रा. उमेश निवास चाळ, हनुमान मंदिराजवळ, जुनी डोंंबिवली) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तस्कराचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सागर चव्हाण आणि पथकाला डोंबिवली पश्चिमेत संध्याकाळच्या वेळेत एक इसम गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे, अशी गुप्त माहिती मिळाली होती. माहिती खात्रीलायक असल्याने वरिष्ठांच्या आदेशावरून विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांना ही माहिती देण्यात आली. पवार यांनी पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे यांना अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या साहाय्याने गांजा तस्कराला पकडण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. एक गुप्त माहितगाराने पोलिसांना ही माहिती दिली होती.
साहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण, पोलीस निरीक्षक गमे आणि पथक शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता जुनी डोंबिवलीतील शिवमंदिर परिसरात साध्या वेशात पोहचले. पोलिसांचे खासगी वाहन मंदिरापासून दूर अंतरावर ठेवण्यात आले. खबर देणारा माहितगार दूर अंतरावर गांजा तस्कर आला की पोलिसांना इशारा देण्यासाठी एका दुकानाच्या आडोशाने उभा होता. साध्या वेशोतील पोलिसांना जुनी डोंबिवलीत शिव मंदिर भागात सापळा लावला.
आठ वाजताच्या दरम्यान एक इसम शिव मंदिर भागातून जात होता. खबऱ्याने तोच गांजा तस्कर असल्याचा इशारा पोलिसांना करताच सापळा लावून बसलेल्या पोलीस पथकाने तस्कराला पळून जाण्याची संधी न देता त्याच्यावर झडप घातली. अमित शिंदे असे नाव त्यांनी सांगितले. त्याच्या जवळ एक किलोहून अधिक वजनाचा २३ हजार रूपये किमतीचा गांजा बंदिस्त पुडक्यात आढळून आला. हा गांजा त्याने कोठुन आणला. तो हा गांजा कोणाला विक्री करणार होता, या पोलिसांच्या प्रश्नांना तस्कर अमित शिंदे याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडून अधिकची माहिती मिळविणे गरजेचे असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर हवालदार नवनाथ काळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांना अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईत साहाय्यक पोलीस निरीक्षक सागर चव्हाण, पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे, पोलीस उपनिरीक्षक जे. जी. ठोके, हवालदार अमित शिंदे, खुशाल नेरकर, नवनाथ काळे सहभागी झाले होते. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी नशामुक्त कल्याण डोंबिवली शहरे अभियान मागील पाच महिन्यांपासून सुरू केले आहे. त्यामुळे शहरातील अंमली पदार्थ तस्करीचे अड्डे उध्वस्त करण्याची जोरदार मोहीम शहरात सुरू आहे.