ठाणे : गेले अनेक वर्षे रखडलेल्या जुन्या ठाण्यातील पुनर्विकास प्रकल्पांना राज्य शासनाच्या नवीन एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीच्या चालना मिळत असतानाच, बांधकाम व्यावसायिकांच्या फसवणुकीमुळे जुन्या ठाण्यात म्हणजे, नौपाडा, कोपरी, पाचपखाडी, उथळसर आणि खोपट भागातील अनेक इमारतींचे रहिवाशी हवालदिल झाले आहेत. एका बांधकाम व्यवसायिकाच्या अटकेनंतर हे प्रकरण उडकीस आले असून त्याची व्याप्ती लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास आता ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जुन्या ठाण्यात म्हणजे, नौपाडा, कोपरी, पाचपखाडी, उथळसर आणि खोपट भागात अनेक इमारती मोडकळीस आल्या आहेत. या इमारतींच्या पुनर्विकासाचे काम घेण्यावरून बांधकाम व्यावसायिकांमध्ये स्पर्धा सुरू आहे. अशातच बांधकाम व्यावसायिकांच्या फसवणुकीचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. ठाण्यातील बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध मे.जोशी एंटरप्रायझेस कंपनीचे भागीदार कौस्तुभ कळके यांना नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. कळके यांनी दोन भागीदारांना बाहेर काढण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून ती बँक आणि कंपनी नोंदणी कार्यालयात सादर करून फसवणुक केल्याचा आरोप कंपनीचे भागीदार सुनिल गंगाधर लिमये यांनी केला असून त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात कामिशा सिंह आणि सुंदरराज हेगडे या दोघे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या कंपनीने जुन्या ठाण्यामध्ये एकूण १६ मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांसोबत इमारत पुनर्विकासाचे करार केले होते. त्यापैकी चार इमारतीमधील रहिवाशांनी घरे रिकामी केली असून या जुन्या इमारती कंपनीने पाडल्या आहेत. त्यापैकी काहींना घरभाडे मिळत नाही. या रहिवाशांची कंपनीकडून फसवणुक करण्यात आल्याचे समोर आले असून याप्रकरणी रहिवाशांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : ठाणे : सार्वजनिक शौचालयाला महिलांनी लावले टाळे, शौचालये दुरावस्थेबाबत नागरिकांनी व्यक्त केला संताप

मे. जोशी एंटरप्रायझेस ही कंपनी कौस्तुभ कळके यांनी सुरू केली होती. या कंपनीत २१ जुलै २०२२ मध्ये सुनिल लिमये आणि जयंतीलाल जैन हे दोघे भागीदार झाले. कौस्तुभ यांनी कामिशा दानबहाद्दुर सिंह आणि सुंदरराज हेगडे यांनी आपसात संगनमत करून सुनील आणि जयंतीलाल यांना कंपनीतून बाहेर काढण्यासाठी निवृत्ती करारावर त्यांच्या खोट्या स्वाक्षरी केल्या आणि ही कागदपत्रे बँक आणि कंपनी नोंदणी कार्यालयात सादर करून फसवणुक केली. असा आरोप सुनील लिमये यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणात कामिशा सिंह आणि सुंदरराज हेगडे या दोघे फरार असल्याचे पोलिस सांगत असले तरी हे दोघे नौपाडा परिसरात फिरत असल्याचे नागरिक सांगत आहेत. एका राजकीय नेत्याच्या वरदहस्तामुळे दोघांना अटक होत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

हेही वाचा : वडाळा-घाटकोपर-ठाणे मेट्रो मार्गिकेचे काम ६५ टक्के पूर्ण, ठाण्यात डिसेंबर २०२५ नंतर मेट्रो धावणार

रहिवाशांची फसवणुक

मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी इच्छूक असलेल्या रहिवाशांना वाढीव क्षेत्र देण्याचे प्रलोभन दाखवून पुनर्विकासाचे काम मिळवायचे. रहिवाशांसोबत करार करायचे. जुनी इमारत पाडून जमीन सपाट करायची आणि वाढीव क्षेत्रासाठी सदनिकाधारकांकडून पैसे घ्यायचे. तसेच या प्रकल्पातील विक्रिसाठी असलेल्या सदनिकांची विक्री करायची. यानंतर प्रकल्पाचे काम सोडून द्यायचे, अशी कार्यपद्धत काही विकासकांकडून अवलंबली जात आहे. अशाचस्वरुपाच्या तक्रारी रहिवाशांनी मे.जोशी एंटरप्रायझेस कंपनीविरोधात केल्या असून त्याआधारे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याची व्याप्ती व त्यातील फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांनी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.

हेही वाचा : कोकण किनारपट्टी ‘सिडको’ला आंदण;  विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती, ‘नगरविकास’च्या अधिकारांना कात्री

ठाणे शहरात रहिवाशांची फसवणुक करणाऱ्या विकासकांविरोधात सातत्याने आवाज उठवून रहिवाशांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे.
जुन्या ठाण्यातील पुनर्विकास प्रकल्पाची कामे करणाऱ्या मे.जोशी एंटरप्रायझेस कंपनीने फसवणुक केल्याच्या तक्रारी रहिवाशांकडून प्राप्त झाल्या असून या रहिवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

संजय केळकर (आमदार, ठाणे शहर)

विकासकाकडून फसवणुक झाल्याने रहिवाशी हवालदिल झाले आहेत. परंतु असे प्रकार घडू नयेत यासाठी रेरा कायद्यामध्येच प्रकल्प ठराविक वेळेत पुर्ण केला नाहीतर विकासकासोबतचे करार रद्द करण्याची तरतुद करायला हवी. तसेच प्रलोभनांना बळी न पडता नागरिकांनी दर्जेदार आणि वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याची क्षमता असलेल्या चांगल्या वर्तणुकीचे विकासकाला संधी द्यायला हवी.

सुनेश जोशी (माजी नगरसेवक, नौपाडा)

मे. जोशी एंटरप्रायझेस कंपनीविरोधात एकूण चार फसवणुकीचे गुन्हे नौपाडा पोलिस ठाण्यात दाखल झाले असून या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या कंपनीने आणखी कुणाची फसवणुक केली असेल तर त्यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तक्रारी कराव्यात.

पराग मणेरे (पोलिस उपायुक्त, ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा)
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In old thane police case registered against a builder who defraud residents and shareholders css