डोंबिवली येथील शिळफाटा रस्त्यावरील पलावा गृह प्रकल्पात इमारतीच्या पाचव्या माळ्यावर राहत असलेली एक चार वर्षाची मुलगी खिडकीतून खाली पडली. खिडकीला जाळ्या नसल्याने हा अपघात घडला. या मुलीला वाचविण्यासाठी एक रहिवासी पुढे आला. तोही जमीनीवर पडून गंभीर जखमी झाला. मुलीवर डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव अश्विनी पाठक आहे. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात जखमी झालेल्या रहिवाशाचे नाव रावत डिसोझा आहे. अश्विनीवर उपचार सुरू आहेत. तिला कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. रावत यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले, असे डाॅक्टरांनी सांगितले. मानपाडा पोलिसांनी सांगितले, अश्विनी आपल्या घरातील सोफ्यावर चढून तेथून उघड्या खिडकीत गेली. खिडकीला बाहेरून लोखंडी जाळ्या नव्हत्या.
हेही वाचा >>> भिवंडीतील पडघा भागात गोळीबार; दोन जण जखमी
खिडकीत गेल्यानंतर तिचा तोल जाऊन ती पाचव्या माळ्यावरून पहिल्या माळ्यावर असलेल्या निवाऱ्यावर पडुन गंभीर जखमी झाली. पहिल्या माळ्यापर्यंत असलेल्या निवाऱ्यावर पडल्याने तिला वाचविण्यासाठी याच इमारतीमधील रहिवासी रावत डिसोझा हे पुढे आले. ते निवाऱ्यावरून जात असताना ते पण निवारा तुटल्याने तळ मजल्याच्या जमिनीवर पडले. त्यांनाही गंभीर दुखापत झाली. रहिवाशांनी अश्विनीला निवाऱ्यावरून काढले. तिच्यासह रावत यांना एम्स रुग्णालयात तातडीने दाखल केले. याप्रकरणाची मानपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. कोणाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला याचा तपास करत आहोत, असे मानपाडा पोलिसांनी सांगितले.