ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १५ हजाराहून अधिक कुटूंबांनी त्यांच्या स्वप्नातले घर साकारले आहे. केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ३३ हजार ३२९ कुटूंबांना घरासाठी मंजुरी मिळाली होती. त्यापैकी आतापर्यंत १५ हजार ८३३ कुटूंबांना त्यांच्या हक्काचे आणि पक्के घर मिळाले आहे. तर, उर्वरित १७ हजार घरे प्रगतीपथावर असून लवकरात लवकर ते पूर्ण केले जाणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आली.

ग्रामीण भागात जे कुटुंब कच्चा घरात राहतात, त्यांना पक्के घर मिळावे, त्यांचे जीवनमान उंचवावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकाराच्या माध्यमातून २०१६ पासून विविध योजना राबविल्या जातात. ठाणे जिल्ह्यच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणा विभागामार्फत या योजनांची अंमलबजावणी केली जाते. केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य सरकार पुरस्कृत असणाऱ्या शबरी, रमाई, आदिम, मोदी अशा विविध घरकुल योजना आहेत. तर, केंद्र पुरस्कृत योजनेत गेल्या वर्षभरापासून प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे. या सर्व योजना मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जात आहेत.

हे ही वाचा… ठाण्यात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यासाठी रस्त्यांची खोदाई?

त्यानुसार, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेत २०१६ – १७ ते २०२३-२४ या कालावधीसाठी १५ हजार ९७० तर, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान या योजनेत २०२३-२४ या कालावधीत ६ हजार २८६ घरांना मंजुरी मिळाली होती. प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजुरी मिळालेल्या १५ हजार ९७० घरांपैकी ९ हजार २६५ घरे पूर्ण झाली असून ६ हजार ७०५ घरे प्रगतीपथावर आहेत. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान या योजनेतील मंजूरी मिळालेल्या ६ हजार २८६ घरांपैकी ६४ घरे पूर्ण झाली आहेत. उर्वरित घरे प्रगतीपथावर आहेत.

तर, राज्य पुरस्कृत आदिम, रमाई, शबरी आणि मोदी या योजनेअंतर्गत २०१६ -१७ ते २०२३-२४ या कालावधीसाठी ११ हजार ७३ घरांना मंजुरी मिळाळी होती. त्यापैकी ६ हजार ५०४ घराचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित घरांची कामेही प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणा विभागामार्फत देण्यात आली.

हे ही वाचा… खालापूरच्या उच्चशिक्षित तरुणाला एक्सप्रेसमध्ये गांजाची तस्करी करताना अटक, कल्याण रेल्वे सुरक्षा बळाची कामगिरी

७९ भूमिहीनांना मिळाली हक्काची जागा

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या हक्काचे घराचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी केंद्र आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजना राबविण्यात येतात. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये ७९ लाभार्थ्यांकडे हक्काची जागा नसल्यामुळे त्यांच्या घरंचे स्वप्न अपुरे राहिले होते. यासंदर्भात, ठाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासनाने पाठपुरावा करून शासकीय आणि इतर योजनेंतर्गत लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून दिल्यामुळे ७९ भूमिहीनांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करता आले, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली.

Story img Loader