शहापूर : शहापूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या अखत्यारीत असलेल्या तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शहापूर पोलीसांनी आश्रमशाळेत कामाठी म्हणून कार्यरत असलेल्या गणपत झिपर गवळी (५७) याला अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्याची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या गुन्ह्याची माहिती उशीरा दिल्यामुळे मुख्याध्यापक जगन्नाथ नामदेव घायवट यांच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर शहापूर तालुक्यातील सर्व शासकीय तसेच अनुदानित आश्रमशाळेच्या मुख्याध्यापक व अधीक्षक यांची शहापुरचे पोलीस उपाधिक्षक मिलिंद शिंदे यांनी तातडीने बैठक घेऊन अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, विनयभंगातील आरोपी असलेल्या गणपत गवळी याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयाकडून देण्यात आली आहे.