डोंबिवली: कल्याण डोंबिवलीतील बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याचे मुंंबई उच्च न्यायालयाचे एकापाठोपाठ एक आदेश होत आहेत. या आदेशाने भूमाफिया, गंतुवणुकदारांची दाणदाणा उडाली आहे. अशाही परिस्थितीत डोंबिवली पश्चिमेत ठाकुरवाडी भागात भूमाफियांनी एक सात माळ्याची बेकायदा इमारत सरकारी जमिनीवर उभारली आहे.
डोंबिवली पश्चिमेतील ठाकुरवाडी भागातील राम मंदिर छेद रस्त्यावर गोकुळ रुग्णालयाच्या परिसरात एक सरकारी भूखंड आहे. या भुखंडाकडे शासन, पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष नाही हा विचार करून भूमाफियांनी मागील दोन वर्षाच्या अवधीत या सरकारी जमिनीवर सात माळ्याच्या बेकायदा इमारतीची उभारणी केली. पालिकेच्या ह प्रभागांंतर्गत हा भाग येतो. अनेक वर्ष रिकाम्या असलेल्या जागेवर बेकायदा इमारतीची उभारणी झाल्याने परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेक वर्ष परिसरातील नागरिक, तरूण या जागेचा क्रिकेट, सार्वजनिक कार्यक्रमासाठी उपयोग करत होते.
या बेकायदा इमारतीविषयी जागरूक नागरिक विनोद जोशी यांनी पालिका आयुक्त, तहसीलदार, ह प्रभाग साहाय्यक आयुक्तांना तक्रारी केल्या. ह प्रभाग साहाय्यक आयुक्तांनी या तक्रारीच्या अनुषंगाने माहिती काढली.या बेकायदा इमारतीला कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागाची परवानगी नसल्याचे आणि ही बेकायदा इमारत सरकारी जमिनीवर उभारण्यात आल्याचे समजले. या बेकायदा इमारतीच्या भूमाफियांना पालिकेने जमीन, बांधकाम परवानगींची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. भूमाफिया ती कागदपत्रे सादर करू शकले नव्हते. ही बेकायदा इमारत अनधिकृत घोषित करून तिच्यावर पालिकेकडून कारवाई करण्यात आली होती.
पालिकेच्या कारवाईनंतर भूमाफियांनी पालिकेकडून तोडण्यात आलेला भाग हिरव्या जाळ्यांनी झाकून तोडलेला भाग पुन्हा सुस्थितीत केला आहे. या बेकायदा इमारतीमधील सदनिका कमी किमतीला विकून भूमाफिया सामान्य घर खरेदीदारांची फसवणूक करण्याची शक्यता आहे. तहसीलदार, ह प्रभाग साहाय्यक आयुक्त, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त यांनी ही सरकारी जमिनीवरील बेकायदा इमारत भुईसपाट करावी यासाठी पालिका आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत, अशी मागणी तक्रारदार जोशी यांनी केली आहे. ही इमारत तोडण्यास पालिका, महसूल अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला तर आपण याप्रकरणी न्यायालयात दाद मागू आणि या बेकायदा इमारतीला पाठबळ देणाऱ्या महसूल, पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करू, असे तक्रारदार विनोद जोशी यांनी सांगितले.
पालिकेच्या नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी ठाकुरवाडीत अशाप्रकारच्या कोणत्याही इमारतीला आम्ही परवानगी दिली नाही, असे सांगितले. तर महसूल अधिकाऱ्यांनी या बेकायदा इमारतीची कागदपत्रे तपासून त्या इमारतीवर कारवाई व्हावी यासाठी आम्ही पालिकेकडे प्रयत्न करणार आहोत, असे सांगितले. मार्चमध्ये तहसीलदारांच्या आदेशावरून आयरेमध्ये जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या शालिक म्हात्रेवर महसूल विभागाने गुन्हा दाखल केला आहे.