ठाणे : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रमाअंतर्गत उपलब्ध झालेल्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या १२३ विद्युत बसगाड्या टप्प्याटप्प्याने दाखल होत असून त्यापाठोपाठ आता पीएम ई बस योजनेच्या पहिल्या टप्प्यात ठाणे शहराचा समावेश झाल्याने नव्या वर्षात फेब्रुवारी महिनाअखरेपर्यंत टिएमटीच्या ताफ्यात शंभर नवीन विद्युत वातानुकूलीत बसगाड्या दाखल होणार आहेत. यामुळे ठाणेकरांचा प्रवास गारेगार होणार आहे. ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात एकूण ३६४ बसगाड्या आहेत. त्यापैकी उपक्रमाच्या स्वत:च्या १२४ बसगाड्या आहेत. तर, उर्वरित २२० बसगाड्या ठेकेदारामार्फत जीजीसी तत्वावर चालविण्यात येत आहेत. एकूण ३६४ पैकी ३०० बसगाड्या प्रत्यक्षात प्रवासी सुविधेसाठी उपलब्ध होत आहेत.
ठाणे शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली आहे. यामुळे प्रवासी संख्येच्या तुलनेत बसगाड्यांची संख्या अपुरी आहे. यामुळेच टिकेचे धनी ठरत असलेल्या ठाणे महापालिका तसेच परिवहन प्रशासनाने बसगाड्यांची संख्या वाढविण्यावर गेल्या काही वर्षांपासून भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रमांर्गत उपलब्ध झालेल्या निधीतून १२३ विद्युत वातानूकूलीत बसगाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ८० बसगाड्या दाखल झाल्या असून या बसगाड्या प्रवासी सुविधेसाठी उपलब्ध होत आहेत. उर्वरित ४३ बसगाड्या येत्या काही दिवसांत दाखल होणार आहेत. त्यापाठोपाठ आता त्यापाठोपाठ आता पीएम ई बस योजनेच्या पहिल्या टप्प्यात ठाणे शहराचा समावेश करण्यात आला असून यामुळे नव्या वर्षात फेब्रुवारी महिनाअखरेपर्यंत टिएमटीच्या ताफ्यात शंभर नवीन विद्युत वातानुकूलीत बसगाड्या दाखल होणार आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.
हेही वाचा : ठाण्यात दहा दिवसांत पंधरा आगीच्या घटना
केंद्र शासनाकडून पीएम ई-बस सेवा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत ३ लाख आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर दहा हजार विद्युत बसगाड्या देशातील १६९ शहरांमध्ये चालविण्यात येणार आहेत. या योजनेच्या योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी शहरांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये ठाणे शहराचा समावेश आहे. यामुळे ठाणेकरांचा प्रवास सुखकर होण्याची चिन्हे आहेत.
“पीएम ई बस या योजनेच्या पहिल्या टप्प्यातही ठाणे शहराचा समावेश झाला आहे. त्यातूून फेब्रुवारी २०२४ पर्यंत १०० बसगाड्या उपलब्ध होणार आहेत.” – अभिजीत बांगर, आयुक्त, ठाणे महापालिका