ठाणे – महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाने (महारेरा) त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून राज्यातील नादारी आणि दिवाळखोरीच्या मार्गावर असलेल्या ३४० गृहनिर्माण प्रकल्पांची यादी जाहीर केली आहे. यातील तब्बल १०९ गृहनिर्माण प्रकल्प हे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आहे. तर यात कल्याण तालुक्यातील सर्वाधिक अशा ७२ प्रकल्पांचा समावेश आहे. तर ठाणे २० आणि पालघर जिल्ह्यातील १७ प्रकल्पांचा समावेश आहे.
ठाणे जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभे राहत आहेत. शहरापासून लांब अशा अनेक गृहप्रकल्पांचा यात समावेश असतो. या प्रकल्पांची उभारणी करणाऱ्या विकासकांकडून इतर गृहप्रकल्पांच्या तुलनेत स्वस्त दरात येथील सदनिकांची विक्री करण्याचे आमिष दाखवले जाते. तसेच अनेक सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील याबाबत मोठी जाहिरातबाजी देखील करण्यात येते. या सर्व गोष्टींचा विचार करून अनेक सर्वसामान्य गृहखरेदीदार या ठिकाणी गुंतवणूक करत असतात. मात्र नंतर प्रामुख्याने आर्थिक बाबींमुळे आणि अल्प प्रतिसादामुळे असे गृहप्रकल्प अर्ध्यातच बंद होतात आणि विकासकांनी दिलेल्या विहित वेळेत गृहखरेदीदारांना सदनिकांचा ताबा मिळू शकत नाही. याच पार्श्वभूमीवर घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांची आणि त्यांच्या सद्यस्थितीची महारेरा छाननी करीत असते. याचबरोबर गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या खरेदीदारांची फसवणूक होऊ नये यासाठी महारेरा विविध उपायोजना राबवीत असते.
गृहनिर्माण प्रकल्प उभारणीवेळी प्रत्येक विकासकाला वा विकास समूहाला महारेराच्या संकेतस्थळावर प्रकल्पाची माहिती आणि नोंदणी करणे बंधनकारक असते. या नोंदणीनुसार महारेरासंबंधित गृहनिर्माण प्रकल्पाची सविस्तर माहिती काढून त्यातून छाननी करत असते. तर संकेतस्थळावर आलेल्या माहितीच्या आधारेच प्रकल्पांची छाननी न करता महरेरा विविध मार्गे माहिती घेत असते. याच अंतर्गत महारेराने एनसीएलटीच्या वेबसाइटवरून छाननी केली. यात राज्यातील ३४० प्रकल्प हे नादारी व दिवाळखोरीच्या टप्प्यावर असल्याचे समोर आले आहे. यामध्ये तब्बल १०९ प्रकल्प हे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आहेत. यामुळे येथील गृहखरेदीदारांच्या चिंतेत भर पडली आहे.
व्यापगत ( लॅप्स) प्रकल्प कुठे ?
कल्याण – ७२ प्रकल्प
( यामध्ये नेपच्यून डेव्हेलपर्स लिमिटेडचे तब्बल ४१ तर २९ प्रकल्प हे निर्मल लाइफस्टाइलचे आहेत तर इतर दोन प्रकल्प हे वाधवान बिल्डकॉन चे आहेत. )
पालघर – १७ प्रकल्प
ठाणे – २० प्रकल्प
व्यापगत प्रकल्प म्हणजे कोणते ?
व्यापगत प्रकल्प म्हणजे ज्या गृहनिर्माण प्रकल्पांनी गृहखरेदीदारांना विहित वेळेत सदनिकेचा ताबा देण्याचे मंजूर केले होते मात्र सदनिका धारकांना ताबा देऊ शकले नाहीत. तसेच आर्थिक समस्यांमुळे प्रकल्प पुर्णत्वासच नेऊ शकले ज्यामुळे गृहखरेदीदारांचे नुकसान झाले. अशा प्रकल्पांचा समावेश व्यापगत प्रकल्पांमध्ये केला जातो.