ठाणे : मागील एक वर्षाच्या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीत महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या घटनांची संख्या चिंताजनक असल्याचे नुकत्याच एका अहवालातून समोर आले होते. असे असतानाच आता जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या वार्षिक सांख्यिकी अहवालातून एक वर्षाचा कालावधी ठाणे जिल्ह्यात ३५५ अल्पवयीन बालकांचे लैंगिक अत्याचार तर १ हजार ३९७ बालकांचे अपहरण झाल्याचे चिंताजनक प्रकरणे समोर आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा ठरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्हा प्रशासनातर्फे महिला आणि बालकांवरील वर्षभरात झालेल्या अत्याचारांची नोंद घेण्यात येत असते. ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहर, ग्रामीण तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नोंद होणाऱ्या या गुन्ह्यांची जिल्हा प्रशासनाकडून हा अहवाल तयार करण्यात येत असतो. करोना काळात ठाणे जिल्ह्यात अल्पवयीन बालके गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकल्याचे दिसून आले होते. या सर्व बालकांना यातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा महिला बालविकास विभातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या. तसेच अनेक मुलांची बालसुधाहरगृहात, तसेच काही बालगृहात देखील रवानगी केली होती. मात्र काही बालगृहात देखील या अल्पवयीन मुलांवर अत्याचार झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. यामुळे जिल्ह्यातील लहान बालकांचा सुरक्षेचा प्रश्न कायम चर्चिला जात असतो.

हेही वाचा…ठाणे: श्वानाला मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

मागील काही दिवसांपूर्वी मागील एक वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यात अडीच हजारहुन अधिक महिलांवर लैंगिक अत्याचार, मारहाण, हुंडाबळी तसेच अनैतिक धंद्यात जबरदस्तीने काम करायला लावणे यांसारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद झाल्याची चिंताजनक माहिती नुकतीच समोर आली होती. असे असतानाच आता मागील एक वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील ३५५ अल्पवयीन बालकांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे ग्रामीण, नवी मुंबई, आणि ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत या सर्व गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर बालकांवरील अत्याचार थांबविण्यासाठी तसेच अल्पवयीन बालकांवर झालेल्या अत्याचारानंतर त्यांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा महिला बालविकास विभाग काम करत असल्याची माहिती जिल्हा महिला बालविकास विभागाकडून देण्यात आली आहे.

बालगृहांची संख्या देखील तोकडी

कोणतेही पालक नसलेले निराधार अल्पवयीन बालकांवर कोणत्याही प्रकारचे अत्याचार झाल्यास त्यांना जिल्हा महिला बाल विकास विभागाच्या अखत्यारीतील बालगृहात देखरेखीखाली ठेवण्यात येते. मात्र सध्या जिल्ह्यात हा बालगृहांची संख्या देखील कमी असल्याचे अनेकदा समोर आले आहे.

अल्पवयीन बालकांवर झालेले अत्याचार

हत्या – ११
लैंगिक अत्याचार -३५५

हेही वाचा…एमआयडीसीच्या निवृत्त अधिकाऱ्याकडून भाच्यानेच घेतली एक कोटी रुपयांची खंडणी

अपहरण – १ हजार ३९७

सोडून देणे – १४
मारहाण – २४४

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane 355 child sexual abuse cases and 1397 kidnappings were reported in a 2023 psg