ठाणे : ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या बसगाड्यांमध्ये ठाणे महापालिका क्षेत्रातील महिलांनाच तिकीटावर ५० टक्के सवलत देण्यात आली होती. त्यामुळे महिला वर्गामध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. तसेच वाहक आणि महिला प्रवाशांमध्ये खटके उडत होते. अखेर ठाणे महापालिकेने हे नियम मागे घेतले असून बसगाड्यांमध्ये सर्व महिलांना सरसकट ५० टक्के सवलत देण्यात यावी असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच महिलांकडून वास्तव्याचा पुरावा मागू नये अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी बसगाडीतील प्रवास विनामूल्य असून त्यांना सोबत ओळखपत्र ठेवावे लागणार आहे.
ठाणे महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात टीएमटी बसगाड्यांमध्ये महिलांना ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, ही सवलत महापालिका क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या म्हणजेच, ठाणे ते दिवा शहरातील महिलांनाच लागू करण्यात आली होती. ठाणे शहरात कल्याण, बदलापूर तसेच विविध भागातून महिला कामानिमित्ताने येत असतात. वागळे इस्टेट, कासारवडवली भागात शहरात जिल्हा शासकीय रुग्णालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला देखील उपचारासाठी येत असतात. ही सवलत केवळ ठाणे महापालिका हद्दीतील महिलांसाठीच असल्यामुळे हद्दीबाहेरील प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात होती.
हेही वाचा : केडीएमटीच्या बसमधून ज्येष्ठांना मोफत प्रवास; महिलांना ५० टक्के सवलत
महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करावा, या उद्देशाने ही सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे ती सवलत सर्वच महिलांना लागू आहे. त्याबाबत, निर्माण झालेला संभ्रम, ओळखपत्रांची तपासणी यात होणारा कालपव्यय आणि वाद यांच्या पार्श्वभूमीवर, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांना ही सवलत योजना सरसकट लागू करण्याचे निर्देश दिले. तसेच, वाहक, तिकीट निरिक्षक यांना याबद्दल तातडीने माहिती द्यावी, असेही स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : देशात तपासयंत्रणा हाताशी धरून खडणीचे रॅकेट, राहुल गांधी यांचा पंतप्रधानांवर आरोप
परिवहन सेवेच्या बसेसमध्ये, गर्दीच्या वेळेची प्रवासी संख्या व महिला प्रवाशांची वाढती संख्या पाहता महिलांना बसेसमध्ये आसन मिळत नसल्याने त्यांचा प्रवास त्रासदायक ठरून महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या बसेसमध्ये डाव्या बाजूकडील आसन व्यवस्था महिलांसाठी राखीव ठेवण्यात येत आहेत. तसेच बसगाड्यांच्या उपलब्धतेनंतर गर्दीच्या वेळी ठराविक मार्गावर स्वतंत्र महिला बस सेवा सुरू करण्याचेही प्रयोजन असल्याचेही आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले.