लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे: पावसाळ्यापुर्वी केल्या जाणाऱ्या नालेसफाईच्या कामांना सुरुवात झालेली नसल्याच्या मुद्द्यावरून सर्वत्र टिका होऊ लागल्यानंतर पालिका प्रशासनाने अखेर नालेसफाईची कामे सुरु केली आहेत. वर्तकनगर परिसर वगळता शहरातील सर्वच भागांमध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून नालेसफाईची कामे सुरु झाली असून निविदा प्रक्रीयेमुळे लांबलेली वर्तकनगर भागातील कामांना येत्या दोन दिवसांत सुरुवात होणार आहे. हि सर्व कामे एका महिन्यात पुर्ण करण्याचे आव्हान पालिका आणि ठेकेदारांपुढे आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात ३८ मोठे तर ५६० छोटे नाले आहेत. या शिवाय, पावसाचे पाणी वाहू नेणारी ४२ गटारे आहेत. मोठे, छोटे नाले आणि पावसाचे पाणी वाहू नेणारी गटारे एकमेकांना जोडण्यात आलेली आहेत. पावसाळ्यात नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी पावसाळ्यपुर्वी नालेसफाईची कामे हाती घेण्यात येतात. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या कामांना सुरुवात होते. परंतु यंदा एप्रिल महिना संपत आला तरी नालेसफाईच्या कामांना सुरुवात झालेली नव्हती.

हेही वाचा… ठाणे: कोरोनाकाळातील अखर्चित निधी पुन्हा ग्रामपंचायतींकडे वर्ग, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मागणीला यश

ठाणे शेजारीच असलेल्या मुंबई आणि नवी मुंबई महापालिकेत नालेसफाईच्या कामांना एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सुरुवात झाली. त्या तुलनेत ठाणे शहर मागे पडल्याचे चित्र होते. एप्रिल महिना संपत आला तरी नालेसफाईची कामे सुरु झालेली नसल्यामुळे पालिकेच्या कारभारावर टिका होत होती. या टिकेनंतर ठाणे महापालिका घनकचरा विभागाने तातडीने निविदा प्रक्रीया उरकून गेल्या चार ते पाच दिवसांपासून नालेसफाईची कामे सुरु केली आहेत. ही कामे योग्यप्रकारे व्हावीत अशी सुचना पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली आहे. या कामांवर ड्रोनच्या मदतीने नजर ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तसेच ३१ मे पुर्वी ही कामे पुर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे एका महिन्याच्या मुदतीत नालेसफाई करण्याचे आव्हान पालिका अधिकारी आणि ठेकेदारांपुढे असून ते हे आव्हान कसे पेलवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा… डोंबिवली, कल्याणमध्ये मोबाईल चोरांचा विद्यार्थ्यांना फटका

दरवर्षीप्रमाणे यंदाही पालिकेने नऊ प्रभाग समिती स्तरावर नालेसफाईच्या कामांसाठी निविदा काढल्या आहेत. या कामांसाठी ९ कोटी ९६ लाख ९७ हजार ९४२ रुपये इतका निधी खर्च केला जाणार आहे. त्यातील १ कोटी ५० लाख ९२ हजार रुपये वस्तु व सेवा कराचे तर ७ लाख ५५ हजार रुपये विम्याचे आहेत. त्यामुळे नालेसफाईच्या कामांवर प्रत्यक्षात ८ कोटी ३८ लाख ४८ हजार रुपये खर्च होणार आहेत. ही कामे करताना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ, जेसीबी, पोकलेन या मशिनचा वापर करून नाल्यातील गाळ काढण्यात येणार आहे.

हेही वाचा… कुटुंब संस्था टिकविण्यासाठी संवाद, समुपदेशन महत्वाचे’, डोंबिवली महिला महासंघाच्या चर्चासत्रातील सूर

शहरातील वर्तकनगर परिसर वगळता इतर सर्वच भागातील निविदा अंतिम करून त्यातून ठेकेदार नियुक्त करण्यात आले असून त्यांच्यामार्फत कामांना सुरुवात करण्यात आली आहे. वर्तकनगर भागातील निविदा प्रक्रीया अंतिम झालेली नसल्यामुळे या ठिकाणी नालेसफाईची कामे सुरु होऊ शकलेली नाहीत. परंतु येत्या एक ते दोन दिवसांत ही कामे सुरु होतील, असा दावा पालिकेने केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane a challenge to the municipality and contractors to complete the drain cleaning works in one month dvr