ठाणे : मिरा रोड येथून नातेवाईकांकडे गृहप्रवेशाच्या पुजेसाठी आलेल्या महिलेचा घोडबंदर येथील गायमुख भागात आरएमसी वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. तर महिलेचे पती देखील जखमी झाले आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मिरा रोड येथे मृत ४८ वर्षीय महिला तिच्या पती आणि मुलासोबत राहते. तिच्या नातेवाईकांनी वर्तकनगर भागात सदनिका खरेदी केली होती. त्याच्या गृहप्रवेशाच्या पुजेसाठी रविवारी त्या पतीसोबत दुचाकीने ठाण्यात आल्या होत्या. रविवारी सायंकाळी गृहप्रवेशाची पुजा झाल्यानंतर त्या घरी जाण्यासाठी निघाल्या. तिचे पती दुचाकी चालवित होते. तर त्या दुचाकीच्या मागील आसनावर बसल्या होत्या.
दुचाकीने दोघेही गायमुख भागात आले असता एका भरधाव आरएमसी वाहनाची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. या अपघातात दोघेही दुचाकीवरून खाली पडले. अपघातात महिलेला गंभीर दुखापत झाली. तर आरएमसी वाहन चालकाने वाहन थांबवून मदत करण्याऐवजी तेथून पसार झाला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी महिलेला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथील डाॅक्टरांनी तिला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. तेथील डाॅक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या अपघाताप्रकरणी तिच्या पतीने कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे आरएमसी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोडबंदरचा प्रवास धोक्याचा
मुंबईपासून जवळ घर असावे यासाठी अनेक नोकरदारांनी घोडबंदरला राहण्यास पसंती दिली. या मार्गालगत मोठ्याप्रमाणात नागरी वस्ती वाढली आहे. वाहनांचा भार वाढला असताना घोडबंदर मार्गावर गेल्याकाही वर्षांमध्ये प्रवास धोक्याचा ठरताना दिसत आहे. घोडबंदर मार्गावरून गुजरातच्या दिशेने अवजड वाहनांची मोठ्याप्रमाणात वाहतुक होत असते. तसेच, या भागात निर्माणाधीन प्रकल्प वाढल्याने आरएमसी प्रकल्पांची संख्या वाढली आहे. या आरएमसी प्रकल्पातील साहित्य वाहतुकीसाठी वाहने वाढली. या आरएमसी वाहनांमुळे घोडबंदर भागाची धुळधाण होत असते. ही वाहने अतिशय बेदरकारपणे चालविली जातात.
या वाहतुकीमुळे गायमुख भागातील नागलाबंदर परिसरातील रस्त्याची अवस्था तर अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे घोडबंदर मार्गावरुन बोरीवली, वसईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या दुचाकी चालकांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन वाहतुक करावी लागते. घोडबंदर भागात रस्त्यांची देखील अवस्था देखील वाईट आहे. अनेक भागात रस्ते असमान झालेले आहेत. तसेच मेट्रो मार्गिकेचे काम देखील घोडबंदर भागात सुरु असल्याने मार्गिका अत्यंत अरुंद झाल्या आहेत. सेवा रस्त्यांवर खोदकामेही याचवेळी सुरु झाल्याने घोडबंदर मार्गावरून प्रवास करणे आता धोक्याचे ठरत असल्याचे चित्र आहे.