ठाणे : ठाण्यातील सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आगाशे (७३) यांच्या अपघाती निधनानंतर शहरात पुन्हा एकदा सीसीटीव्हीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ज्या ठिकाणी अपघात झाला. त्या ठिकाणी काही मीटर अंतरावर असलेला सीसीटीव्ही कॅमेरा बंद होता. सकाळी झालेल्या अपघातानंतर संबंधित कंपनीने दुपारनंतर तेथील सीसीटीव्ही पुन्हा सुरू केला. तीन हात नाका सारख्या गजबजलेल्या चौकात अशी अवस्था असेल तर इतर ठिकाणांचे काय असेल असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे महापालिकेने सुमारे पाच ते सहा वर्षांपूर्वी महापालिका क्षेत्रातील ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या शहरात १ हजार ४०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे मुख्य तसेच अंतर्गत मार्गांवर बसविण्यात आले आहे. यातील सुमारे साडेतीनशे सीसीटीव्ही कॅमेरे ठाणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात जोडण्यात आले आहेत. महापालिका क्षेत्रातील प्रत्येक चौकात किमान तीन ते चार सीसीटीव्ही कॅमेरे हे पोलिसांच्या आख्यारित आहेत. तर उर्वरित ठाणे महापालिकेच्या नियंत्रण कक्षात संकलित केले जाते. तीन हात नाका येथील चौकातील सिग्नल जवळ पुष्पा आगाशे यांचा अपघाती मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक फरार झाला होता. पोलिसांनी त्याला अटक केली असली तरी त्याची जामीनावर सुटका झाली आहे.

पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू होता. त्यावेळी एक सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यानंतर नौपाडा पोलिसांनी उपस्थित साक्षीदाराने दिलेली माहिती आणि परिसरातील इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन वाहन चालकाला अटक केली. परंतु या प्रकारामुळे आगाशे यांच्या काही निकटवर्तीयांनी नाराजी व्यक्त केली. ठाणे शहरातील तीन हात नाका चौकात नेहमी वाहनांची गजबज असते. जर या मुख्य चौकात अशी अवस्था असेल. तर इतर शहरात काय परिस्थिती असले असा प्रश्न त्यांच्याकडून विचारला जात आहे.

याबाबत ठाणे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याला विचारले असता, आम्ही काही सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नियंत्रण ठाणे पोलिसांना दिले आहे. त्यामुळे या सीसीटीव्ही कॅमेऱ्याबाबत चित्रीकणाची तपासणी त्यांच्याकडून होते. तीन हात नाका भागातील आमच्या आख्यारित असलेले सीसीटीव्ही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तर ठाणे पोलिसांना याबाबत विचारले असता, साडे तीनशे सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत की नाही याबाबत नेहमी आम्ही तपासणी करतो. तांत्रिक कारणामुळे एखादा कॅमेरा बंद झाल्यास त्याची तात्काळ दुरुस्ती केली जाते असा दावा त्यांनी केला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane accidental death of social activist pushpa agashe cctv cameras at teen hath naka closed question raised about situation in the city asj