ठाणे : ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय साहाय्यक पल्लवी सरोदे (३७) यांचा श्रीक्षेत्र हरिहरेश्वर येथील समुद्र किनाऱ्यावर बुडून मृत्यू झाला. सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात महसूल कर्मचारी संंघटनेच्या वतीने पल्लवी सरोदे यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह सर्वच कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. पल्लवी यांच्या १३ वर्षांचा मुलगा आणि तिच्या कुटुंबियांच्या मागे आपण सर्वांनी पहाडा प्रमाणे उभे राहू असे शिनगारे यावेळी म्हणाले.

साहाय्यक महसूल अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी यांच्या स्वीय साहाय्यक म्हणून पल्लवी सरोदे या कार्यरत होत्या. सरोदे यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील काही महिला कर्मचारी श्रीक्षेत्र हरिहरेश्वर येथे फिरण्यासाठी गेल्या होत्या. येथील समुद्र किनाऱ्यावरील दगडावर पल्लवी सरोदे या बसल्या होत्या. त्यावेळी समुद्राची एक लाट आली आणि या प्रवाहात सरोदे यांचा बुडून मृत्यू झाला. सरोदे यांच्या मृत्यूने जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. सरोदे यांच्या शोकसभेचे आयोजन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका सभागृहात करण्यात आले होते. या शोकसभेत आठवणींना उजाळा देताना सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले.

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे देखील या शोकसभेत उपस्थित होते. पल्लवी ही माझ्या मुलीसारखी होती. सकाळी कार्यालयात येण्यापूर्वी आज पल्लवी कार्यालयात नसणार या विचाराने माझ्या अंगावर काटा आला होता. त्यांचा १३ वर्षांचा मुलगा काल आईसाठी टाहो फोडत होता. तिच्या कुटुंबासाठी आणि १३ वर्षांच्या मुलाच्या मागे आपण पहाडा सारखे उभे राहायला हवे. तसेच भविष्यात इतर कोणत्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर अशी वेळ आल्यास त्यांच्या मागे देखील राहायला पाहिजे. आपण भौतिकतेपेक्षा संवेदनशीलता आणि माणूसकी जपली पाहिजे असे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे म्हणाले.

यावेळी पल्लवी यांच्यासोबत काम करणाऱ्या इतर सहकारी आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांनीही आठवणींना उजाळा दिला. पल्लवी यांच्याकडे कोणतीही माहिती हवी असल्यास त्या तात्काळ देत. त्या कधीही वरिष्ठ आणि कनिष्ठ असा भेदभाव करत नसत. त्यांचा स्वभाव नेहमी हसतमुख असायचा. त्या प्रत्येक कार्यक्रमात पुढाकार घेत. त्या अधिकारी होत्या, त्यासोबत उत्तम कलाकारही होत्या. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने आईसाठी फोडलेला टाहो डोळ्यांसमोरून जात नसल्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सांगितले. पल्लवी यांचा दोनच दिवसांपूर्वी वाढदिवस होता. पल्लवी यांचे अचानक निघून जाणे मनाला चटका लावणारे ठरल्याचे अधिकारी आणि कर्मचारी म्हणाले.

या शोकसभेस अपर जिल्हाधिकारी विकास गजरे, उमेदच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदिप माने, जिल्हाधिकारी कार्यालय व ठाणे महसूल प्रशासनातील सर्व उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, उद्योग विभागाच्या सहसंचालक विजू शिरसाठ, उपसंचालक सीमा पवार, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सोनाली देवरे, तहसिलदार, नायब तहसिलदार आणि ठाणे जिल्हा प्रशासनातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.