अंबरनाथः राज्यातील गोरगरीब जनतेला सण उत्सवांच्या काळात मदत म्हणून अवघ्या शंभर रूपयात सहा जिन्नस असलेला एक अन्न धान्याचा संच दिला जातो. परंतु या संचातील शिधा काळाबाजारात विकण्यासाठी नेला जात असल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे. सामाजीक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हा साठा पकडण्यात आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शिधावाटप दुकानाला टाळे ठोकण्यात आले आहे.
हेही वाचा : किरकोळीत ‘घाऊक’ लूट, घाऊक बाजारात दोन ते पाच रुपयांची दरवाढ; किरकोळीत भाज्यांचे दर दुप्पट
हेही वाचा : Eknath Shinde : आरक्षण रद्द करणाऱ्यांविरोधात आम्ही उभे राहू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्य सरकारच्या माध्यमातून काही सण उत्सवांच्या काळात अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्यांना सहा अन्न धान्य असलेला एक संच सवलतीच्या दरात म्हणजे शंभर रूपयांत दिला जातो. त्यामुळे सण उत्सवांच्या काळात गोरगरीब जनतेला त्याचा फायदा होता. आचारसंहितेमुळे गेल्या तीन महिन्यात हा शिधा देता आला नव्हता. त्यामुळे आता गणेशोत्सवाच्या तोंडावर हा शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आला. अंबरनाथ शहरातही अशाप्रकारे आनंदाचा शिधा आणि पंतप्रधान योजनेतील शिधा शिधावाटप दुकानांमध्ये देण्यासाठी आला होता. येथील पूर्वेतील महालक्ष्मी नगर येथील शिधावाटप दुकान क्रमांक ४६ एफ १ या दुकानातील हा शिधा एका टेम्पोमधून बाजारात विक्रीसाठी नेला जात होता. याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोसावी यांनी हा टेम्पो अडवून हा गैरप्रकार उघडकीस आणला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी टेम्पो आणि त्यातील शिधा जप्त केला. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी सुभाष भारती आणि कुदनकुमार गुप्ता या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी चार लाख ३५ हजार रूपयांचे विविध अन्न धान्य जप्त केले आहे. अपहार करण्यात आलेल्या अन्नधान्याच्या साठ्यात एक लाख १४ हजार रुपयांचा २ हजार ८७५ किलो तांदूळ, ५ हजार ५७० रुपये किमतीचे प्रधानमंत्री पिशवी ५५७ नग, अंत्योदय साखर १० किलो, साडी २ नग, ७०० रुपये, ७६,५०० रुपये किमतीचा आनंदाचा शिधा यात रवा, साखर, चनाडाळ, तेल प्रत्येकी एक किलो, २७ हजार रूपये किमतीचा आनंदाचा शिधा प्रकारातील २७० नग तेल अशा जिन्नसाचा समावेश आहे.